मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार : नवनाथ बन
मुंबई : शिवसेना (उबाठा) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानांचा समाचार घेताना भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी आज जोरदार प्रतिहल्ला चढवला. मुंबई महापालिका निवडणूक, अंमली पदार्थांचा मुद्दा आणि पक्षांतर्गत वादावरून नवनाथ बन यांनी ११ मुद्द्यांच्या आधारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. "उद्धव ठाकरे घरात बसून आहेत आणि संजय राऊत स्वतःला पक्षप्रमुख समजू लागले आहेत," अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या वाढत्या हस्तक्षेपावर बोट ठेवले.
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना आज वेग आला असून, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी अखेर भाजपचे ...
मुंबई महापालिका आणि महापौराचा प्रश्न
नवनाथ बन यांनी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, "महापौर कोणाचा? या एका प्रश्नाने उबाठा गटाची अस्वस्थता समोर आली आहे. निवडणूक जवळ आल्याने राऊतांच्या मनात भीती निर्माण झाली असून, मुंबईकर आता महायुतीलाच कौल देतील."
भ्रष्टाचार आणि ड्रग्ज प्रकरणावर उत्तर
महाराष्ट्रात ड्रग्जचा विळखा वाढत असल्याच्या आरोपाचा समाचार घेताना बन म्हणाले की, "महाराष्ट्र ड्रग्जच्या नव्हे, तर भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात रोज १०० कोटींची वसुली महाराष्ट्राने पाहिली आहे. पत्राचाळ आणि कोविड घोटाळे विसरून राऊत आज उपदेश देत आहेत, हे हास्यास्पद आहे."
'जैसी करणी वैसी भरणी'; पक्षफोडीवरून टोला
भाजपवर पक्ष फोडल्याचा आरोप करणाऱ्या राऊतांना बन यांनी इतिहासाची आठवण करून दिली. "मनसेचे सात नगरसेवक फोडणारे आज नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत. २०१९ मध्ये युती तोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी कोणी लावली? उद्धव ठाकरेंनी स्वतःच शिवसेना संपवली आहे, भाजपने कोणाचा पक्ष गिळलेला नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेलारांची कविता आणि राऊतांची अस्वस्थता
आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर केलेल्या उपरोधिक कवितेचे समर्थन करताना बन म्हणाले की, "त्या कवितेने राऊत प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. खोटं बोलण्याचा जागतिक पुरस्कार असेल तर राऊत त्यात नक्कीच पहिले येतील. लोकांचे मनोरंजन करण्यापेक्षा त्यांनी कामाकडे लक्ष द्यावे." धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. फडणवीस सरकार कोणालाही वाचवत नाही, कायदेशीर प्रक्रियेनुसार योग्य ती कारवाई होईलच. भाजप कार्यकर्त्यांच्या जिवावर लढतो. कोविड काळातील भ्रष्टाचाराचा हिशेब आधी राऊतांनी द्यावा. "टप्प्याटप्प्याने उबाठा गटाचाच गेम होणार असून, २०१७ च्या पाठीत खंजीर खुपसल्याचा हिशेब आता मुंबईकर पूर्ण करतील," असा इशारा नवनाथ बन यांनी शेवटी दिला.




