पंजाबमधील ब्लॉक कमिटी निवडणुकीत 'आप'ला मोठे यश मिळाले. पण या विजयाच्या आनंदाला हिंसेचे गालबोट लागले. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. पंजाबमध्ये मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून हिंसाचार आणि गोळीबार झाला. गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना लुधियानातील गिल परिसरातील बचितर नगरमध्ये घडली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपास करत आहेत. दोन्ही पक्षांनी हिंसेसाठी एकमेकांवर आरोप केले आहेत.
गोळीबारात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जखमी कार्यकर्त्यांची नावं आम आदमी पार्टीने जाहीर केली आहे. काँग्रेसकडून झालेल्या गोळीबारात गुरुमुख सिंग (६५), रविंदर सिंग (४४) आणि मनदीप सिंग (३६) जखमी झाल्याचे आम आदमी पार्टीने सांगितले.
पंजाबमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या दणदणीत विजयानंतर आम आदमी पार्टीने ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या. अशीच एक विजयी मिरवणूक लुधियानातील गिल परिसरातील बचितर नगरमधून जात होती. या मिरवणुकीवर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोळीबार केला असा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.






