मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ झाल्याचे वृत्त आहे. आयकर विभागाच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरावर धाड टाकली आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा याच्या हॉटेल बॅस्टियन रेस्टॉरंटशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. हॉटेलशी संबंधित संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि कर भरणा प्रकरणाची आयकर विभागाचे पथक चौकशी करत आहे. राज कुंद्राच्या खासगी तसेच व्यावसायिक आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी होत आहे.
आयकर विभागाने मुंबई आणि बंगळुरू येथे धाडी टाकून तपास सुरू केला आहे. यामुळे शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि गोव्यात बास्टियन नावाने क्लब आणि रेस्टॉरंट चालवणाऱ्या बास्टियन हॉस्पिटॅलिटीच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे, बंगळुरू येथे आयकर विभागाने ठिकठिकाणी धाडी टाकल्याचे समजते. याआधी बुधवारी बंगळुरू पोलिसांनी बास्टियनसह दोन रेस्टॉरंट्सविरुद्ध त्यांच्या परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. शिल्पा शेट्टीकडे बास्टियन गार्डन सिटीमध्ये ५० टक्के हिस्सा असल्याचे वृत्त आहे.
आयकर विभागाने चर्च स्ट्रीटवरील बास्टियन पबवरही छापा टाकला. या कारवाईची माहिती अद्याप जाहीर झालेली नसली तरी, आता शिल्पाच्या मुंबईतील घरावरही छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.
बास्टियन गार्डन सिटी रेस्टॉरंट हे उद्योगपती रणजीत बिंद्रा यांनी स्थापन केलेल्या बास्टियन हॉस्पिटॅलिटीद्वारे चालवले जाते. वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीने २०१९ मध्ये या उपक्रमात गुंतवणूक केली होती.






