Tuesday, January 6, 2026

महापालिका निवडणुकीसाठी भाजप-सेनेची महायुती

महापालिका निवडणुकीसाठी भाजप-सेनेची महायुती

श्रमजीवी आणि आगरी सेनाही सोबत

विरार : वसई - विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम लागला असून युतीची अधिकृत घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासह आरपीआय (आठवले) यांना देखील सोबत घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे वसई-विरारमध्ये स्थानिक बहुजन विकास आघाडी पक्षासमोर आता केवळ भाजपचे नव्हे, तर महायुतीचे कडवे आव्हान असणार आहे.

वसई - विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अानुषंगाने सर्वच राजकीय पक्षांमध्ये आघाडी आणि महायुतीबाबत खलबत्ते सुरू आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात दोन आठवड्यापूर्वीच युतीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. तर बहुजन विकास आघाडी सोबत आघाडी करून महापालिका निवडणूक लढायची यासाठी उबाठा गट, काँग्रेस या दोनही पक्षातर्फे चर्चा सुरु आहेत. उबाठा गटाच्या नेत्यांनी मंगळवारीच बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्याशी भेट घेत आघाडी बाबत चर्चा केली. एकीकडे बविआ सोबत विविध राजकीय पक्षांच्या चर्चा सुरू असताना भाजप आणि शिवसेना युती करून महापालिका निवडणूक लढणार असल्याचे आमदार राजन नाईक यांनी जाहीर केले.

या युतीबाबत शिवसेना शिंदे गटाचे पालघर संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर तर भाजपकडून आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील यांची बुधवारी संयुक्त बैठक झाली. त्यानंतर आमदार नाईक आणि माजी आमदार फाटक यांनी युतीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. त्याचप्रमाणे युतीमध्ये भाजप - सेनेसह राष्ट्रवादी, आरपीआय ( आठवले ) आणि श्रमजीवी तसेच आगरी सेना या संघटनांना महायुतीमध्ये सामील केल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. तर जागा वाटपाबाबत स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील ते पुढे म्हणाले. निवडून येणारे उमेदवार हीच व्याख्या जागा वाटपासाठी लावण्यात येणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment