Thursday, December 18, 2025

भाजप आमदार राम कदमांनी पाच वर्षांनी कापले केस, कारण जाणून घ्याल तर चक्रावून जाल

भाजप आमदार राम कदमांनी पाच वर्षांनी कापले केस, कारण जाणून घ्याल तर चक्रावून जाल

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी तब्बल पाच वर्षांनंतर सार्वजनिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केस कापले. केस कपाताना माईक हातात घेऊन राम कदम यांनी केस पाच वर्ष वाढवण्याचे कारण स्वतःच जाहीर केले.

जोपर्यंत घाटकोपरची पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प राम कदम यांनी केला होता. हा संकल्प पूर्ण झाला म्हणून तब्बल पाच वर्षांनंतर घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी केस कापत असल्याचे जाहीर केले.

मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये घाटकोपरचा समावेश होतो. या घाटकोपरमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना एकच चौदा लाख लिटरची पाण्याची मोठी टाकी होती. यामुळे स्थानिकांना पाणी टंचाईच्या समस्येचा वारंवार सामना करावा लागत होता. घाटकोपरमध्ये पाण्याची गंभीर समस्या होती. ही समस्या सुटेपर्यंत केस कापणार नाही, असा संकल्प राम कदम यांनी केला. यानंतर पाठपुरावा करुन प्रशासकीय यंत्रणेच्या संपर्कात राहून राम कदम यांनी घाटकोपरसाठी २२ लाख लिटर क्षमतेची पाण्याची महाकाय टाकी उभारण्याचा निर्णय घेतला. भांडुप पासून घाटकोपरपर्यंत चार किमी. लांबीची जलवाहिनी टाकून नागरिकांना पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली. आता ही व्यवस्था मार्गी लागत असल्याचे पाहून राम कदम यांनी केस कापण्याचा निर्णय घेतला.

महाकाय टाकीमुळे घाटकोपर पश्चिमची पाण्याची समस्या सुटणार असल्याचे राम कदम म्हणाले. जनतेच्या प्रश्नांना सदैव प्राधान्य देतो आणि देणार असेही त्यांनी सांगितले. राम कदमांच्या कार्याचे नागरिक कौतुक करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >