Thursday, December 18, 2025

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट'

पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आता जल पर्यटनाची (Water Tourism) विशेष सोय करण्यात आली आहे. किरंगीसरा, कोलीतमारा ते नवेगाव खैरी या विस्तीर्ण जलमार्गावर पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी २२ सीटर अत्याधुनिक सोलर बोट पेंचमध्ये दाखल झाली आहे.

प्रत्यक्ष पाहणी आणि सुविधांचा आढावा नुकतीच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सहकाऱ्यांनी या सोलर बोटीतून विहार करत संपूर्ण मार्गाची तांत्रिक पाहणी केली. उपलब्ध सुविधा, सुरक्षितता आणि पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गाचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरच अशाच प्रकारची दुसरी सोलर बोटदेखील येथे उपलब्ध होणार असून, यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. पेंचच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन पेंच व्याघ्र प्रकल्प हे त्याच्या दुर्मिळ वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीतून वाहणारी विस्तीर्ण नदी हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. या जल सफारीदरम्यान पर्यटकांना केवळ पाण्याचा शांत अनुभव मिळणार नाही, तर विविध दुर्मिळ आणि स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन घडेल. नदीकाठी पाणी पिण्यासाठी येणारे वाघ, बिबट्या आणि इतर वन्यप्राणी पाहण्याची दुर्मिळ संधी मिळेल.

पर्यावरणपूरक सोलर बोट असल्यामुळे आवाजाचं प्रदूषण होणार नाही, परिणामी वन्यजीवांना त्रास न होता पर्यटकांना शांततेत निसर्ग अनुभवता येईल. लवकरच उद्घाटन आणि पर्यटकांना आवाहन या दोन्ही सोलर बोटींचे उद्घाटन लवकरच एका विशेष सोहळ्यात करण्यात येणार आहे. त्यानंतर या बोटी सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुल्या केल्या जातील. भविष्यात येथे अधिक अत्याधुनिक बोटी उपलब्ध करून देण्याचा मानस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

"पेंच व्याघ्र प्रकल्प हे एक निसर्गसंपन्न ठिकाण आहे. येथील जल पर्यटनाचा सुरक्षित आणि शांत अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी," असे आवाहन प्रशासकीय स्तरावरून करण्यात आले आहे.

बोटीची ठळक वैशिष्ट्ये:

क्षमता : २२ सीटर मोठी सोलर बोट.

मार्ग : किरंगीसरा - कोलीतमारा ते नवेगाव खैरी.

वैशिष्ट्य : पूर्णपणे पर्यावरणपूरक, आवाजाचा त्रास नाही.

फायदा : जलमार्गावरून वन्यजीव आणि पक्षी निरीक्षणाची विशेष संधी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >