संक्रांत कोणावर?

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अपेक्षेप्रमाणे सोमवारी जाहीर केल्याने राज्यात 'महापालिकांचा महासंग्राम' सुरू झाला आहे. त्यात आता मकर संक्रांतीपर्यंत खंड पडणार नाही. या वर्षाची संक्रांत कोणावर आणि तीळगूळ कोणाला, ते संक्रांतीनंतर दोन दिवसांनी ईव्हीएम मशीनमधूनच उघड होईल. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नॉनस्टॉप सात दिवस चालवण्याचं सरकारने कामकाज सल्लागार समितीत संमत करून घेतलं, तेव्हाच १४ डिसेंबरनंतर कोणत्याही क्षणी महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार, हे स्पष्ट झालं होतं .अन्यथा, नागपूरच्या मनमौजी थंडीत कोण कशाला रविवारीही कामकाज ठेवेल? सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २६ जानेवारीपूर्वी आटोपण्याचे आदेश दिले आहेत. नगर परिषदा आणि नगरपंचायतींचं मतदान झालं असलं, तरी अद्याप मतमोजणी आणि निकाल जाहीर होणं शिल्लक आहे. त्याबाबतही न्यायालयाने आदेश दिले आहेत. पण, त्या आदेशांबाबतच प्रशासकीय यंत्रणेच्या मनात गोंधळ आहे. त्या गोंधळाचं निराकरण झालं, की ते निकाल लागतीलच. पण, तोपर्यंत सगळ्यांचं लक्ष महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे लागलं असेल. सर्वच राजकीय पक्षांसाठी शक्तिप्रदर्शनाची ही उत्तम संधी आहे. विद्युतवेगाने नागरिकरण सुरू असलेल्या महाराष्ट्रातल्या महानगरी मतदाराच्या मनात आपलं स्थान नेमकं काय आहे, हे साऱ्या देशाला दाखवून देण्याची संधी महाराष्ट्रातल्या विविध पक्षांच्या नेत्यांना यानिमित्ताने मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी व्यूहरचना कधीचीच करून ठेवली आहे. आता साधनसामग्रीसह मैदानात उतरणं तेवढं बाकी आहे.


नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत जो राजकीय गोंधळ दिसला, तसाच गोंधळ या निवडणुकांतही बघायला मिळणार आहे. महाविकास आघाडी राज्यातून संपल्यात जमा आहे. आघाडीला धरून ठेवणारी शरद पवार नावाची शक्तीच आघाडीतून बाहेर पडली आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील आपल्या तुटल्या तुकड्यासोबत निवडणुकीत युती करण्याचं नक्की केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च चाणक्य अमित शहा यांनीही या जुळवाजुळवीला कालच दिल्लीत संमती दिली आहे. शरद पवार आणि अजित पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन तुकड्यांत अजित पवार यांचा तुकडा सध्या चांगलाच ताकदवान आहे. अजितदादा स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना दिल्लीत अजून मंत्रीपद मिळालं नसलं, तरी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना तेल आणि नैसर्गिक वायूशी संबंधित तालेवार समितीचं अध्यक्षपद मिळालं आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा दिल्लीच्या वर्तुळातला वावर सहजपणे होतो आहे. त्यामुळे या दोन पक्षांत जुळवून घेण्याची गरज सर्वाधिक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला वाटायला हवी. पण, दिसतं आहे ते वेगळंच. दुसऱ्या गटाबरोबर जुळवून घेण्याबाबत अजित पवार गटच जास्त उत्सुक दिसतो आहे. कारण, दोन तुकड्यांत हा गट ताकदवान असला, तरी महायुतीत प्रतिष्ठेने राहायचं, तर या निवडणुकीत जे बळ दाखवावं लागणार आहे, ते शरद पवार यांच्या तुकड्याच्या सहकार्याशिवाय शक्य नाही, हे त्यांना समजून चुकलं आहे. तटकरे आणि पटेल यांनी म्हणूनच शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडून या सहकार्याला संमती मिळवली. शरद पवार गटाचे कार्यकर्ते राज्यात सध्या निर्नायकी अवस्थेत आहेत. खुद्द पवार यांना वय आणि आजारपण यामुळे अन्य नेत्यांच्या तडफेने राजकारण करणं केवळ अशक्य आहे. त्यांच्याशिवाय त्या पक्षात पक्षावर प्रभाव पाडेल, पक्षसंघटनेला एकत्र बांधून ठेऊ शकेल, असा दुसरा नेता नाही. हे खुद्द शरद पवार यांना सर्वात आधी लक्षात आलं असेल. त्यामुळे, पक्ष अगदीच 'शून्या'त जाण्यापेक्षा आपल्याच पुतण्याशी समझोता करून (स्वतःला वेगळं ठेऊन) पक्ष महायुतीच्या वाहत्या प्रवाहात सोडून देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला दिसतो. शरद पवार आणि शहा यांच्यातल्या एकेरी सामन्यात हा अंतिमतः शहा यांचाच विजय असल्याने तटकरे आणि पटेल यांना परवानगी मिळवणं अगदीच सोपं गेलं असणार. शेवटी, 'करून दाखवलंच' म्हणून त्यांनी शहा यांची शाबासकीही मिळवली असेल!


पण, तरीही यात एक अडचण आहेच. नवाब मलिक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत नवाब मलिक यांचा चेहरा महायुतीत दिसायला नको आहे. भाजपला मुस्लीमबहुल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला लढवायचं आहे. त्यामुळे, राष्ट्रवादीला त्यांना पूर्ण सोडायचंही नाही आहे. सना मलिक या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी मुंबईत महायुतीशी अप्रत्यक्ष समन्वयाने पन्नासेक जागा लढेल. असाच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आणखी काही ठिकाणचा अपवाद करत राष्ट्रवादी महायुतीत असेल. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह! उबाठाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती नक्की केलीच आहे. पण, मुंबईच्या काँग्रेसला मनसे नको आहे. उबाठा आणि मनसे यांनी परस्परात जागा वाटपासह सर्वच गोष्टी नक्की केल्या आहेत. त्याची प्रचारनीती, घोषणा सगळंच ठरलं आहे. काँग्रेसशिवाय. त्यामुळे, महायुतीतल्या उरल्यासुरल्या काँग्रेसवर आपोआपच 'एकला चलो'ची वेळ आली आहे. त्यांचे जे नेते या भाषेत इतरांना इशारे देत होते, त्यांना आता मोठी संधी आहे. काँग्रेसमध्ये किती जण या स्थितीत संतुष्ट असतील आणि 'दिल्ली'ची पक्षाच्या या स्थितीबद्दल काय प्रतिक्रिया असेल, ते तेच जाणोत. थोडक्यात काय, मैदानात पाऊल टाकण्याआधीच महायुती आणखी बळकट झाली आहे. त्यांच्यासमोर संपूर्ण महाराष्ट्रात एकच एक असा प्रतिस्पर्धीच कुठे नसणार, हे आताच स्पष्ट झालं आहे!

Comments
Add Comment

भाजपमध्ये नवीन पर्व

भारतीय जनता पार्टीने नुकतेच बिहारचे कॅबिनेट मंत्री नितीन नवीन यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. ते

मेसी मानिया

कोलकात्यातील विवेकानंद युवा क्रांती मैदानात अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लियोनेल मेसी याचे आगमन झाल्यावर त्याला

शेतकऱ्याचं मरण

प्रयत्न करूनही काही प्रश्न जेव्हां सुटत नाहीत, तेव्हां त्यावर तात्पुरती उपाययोजना करून प्रश्न बाजूला सारावा

प्रवासी ठकले!

दहा दिवस झाले, तरी देशात हवाई प्रवास क्षेत्रात झालेला घोळ संपायची चिन्हं दिसत नाहीत. 'आता निदान पंधरा दिवसांत तरी

वंचितांचा आवाज निमाला!

डॉ. बाबा आढाव केवळ व्यक्ती नव्हती. गेली सात दशकं महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यांत, जिथे अन्याय होईल तिथे

नाईट ऑफ फायर डे ऑफ शेम!

एरवी गोवा हे तसे शांत राज्य. तिथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. अर्थात अगदी उत्तर प्रदेश किवा बिहारसारखी