मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची घेतली जबाबदारी
कोलकाता : अर्जेंटिनाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या ‘जीओएटी टूर’ कार्यक्रमादरम्यान साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्यानंतर, पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याने अरूप यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मेस्सीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर अरूप विश्वास यांच्यावर चौफेर टीका झाली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हाताने लिहिलेल्या पत्रात विश्वास यांनी म्हटले आहे की, या घटनेची ‘स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी’ सुनिश्चित करण्यासाठी ते पायउतार होत आहेत. मेस्सीचा भारत दौरा गोंधळात सुरू झाला. मेस्सी २० मिनिटांत तेथून निघून गेला. यानंतर १५ हजार रुपयांपर्यंत तिकीट घेतलेल्या संतप्त प्रेक्षकांनी मैदानात गोंधळ घातला.






