वार्तापत्र : मध्य महाराष्ट्र
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्याने तब्बल आठ वर्षांनंतर आता स्थानिक पातळीवर निवडणुकीचा सामना रंगणार आहे. भाजपची राष्ट्रवादीशी युती होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याने पुण्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी, अशी तिरंगी लढत रंगणार आहे. त्या तिरंगी लढतीतही ‘भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी अशीच लढत होईल, असे चित्र आहे.
महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने आता प्रत्येक पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपने १२५ नगरसेवक निवडून आणण्याचे ठरवले आहे. प्रशासनाखाली असलेल्या पुणे महापालिकेला अखेर निर्वाचित सभागृह मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका २०१७ ला झाल्या होत्या. फेब्रुवारी २०२२ मध्ये हा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर महापालिका निवडणुका जाहीर होणे अपेक्षित होते. इतर मागासवर्गाचे आरक्षण आणि प्रभागरचना यावरून न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे तब्बल ३ वर्षे महापालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर न्यायालयाने मे महिन्यात या सर्व याचिकांवर निकाल देताना ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्रभागरचनेपासून आरक्षण सोडतीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून तब्बल ८ वर्षांच्या कालावधीनंतर महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
दरम्यान मागील तीन वर्षांत राज्यात बदललेली सत्तासमीकरणे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पडलेली फूट यामुळे पुणे महापालिकेची राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. त्यामुळे १२० नगरसेवक निवडून आणण्याचा दावा करणाऱ्या भाजपला पुण्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे महापालिका निवडणुकांच्या आचारसंहिता जाहीर होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप व राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले, तर काही ठिकाणी शिवसेनेसमवेत युती होणार असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सामना होणार हे चित्र स्पष्ट झाले. महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकमेकांसमोर ८५ जागांवर काटे की टक्कर दिली होती. त्यानंतर भाजपने ५० जागा, तर उर्वरित ३५ जागा या राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. आता या जागा एकत्र लढल्या असत्या तर मविआला सहज उमेदवार मिळाला असता आणि या जागांवरील लढत चुरशीची होण्याची शक्यता होती. सध्याच्या परिस्थितीत तेथे भाजप आणि राष्ट्रवादी लढत झाली तरी शक्यतो विजय हा महायुतीचाच व्हावा अशी रणनिती आखण्यात आली आहे. भाजपने राष्ट्रवादीसोबत युती नाही असे सांगितल्यावर अजित पवार यांची राष्ट्रवादी कामाला लागली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढाव्यात यासाठी शरद पवार यांना प्रस्तावही देण्यात येणार आहे. यासाठी एक मोठा नेता प्रयत्न करत असल्याचेही समोर येत आहे. पण, त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे. प्रचार करण्यासाठी उमेदवारांना प्रचारासाठी जेमतेम १२ दिवसांचा अवधी मिळणार आहे. म्हणूनच, सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांना प्रचारातील प्रत्येक दिवस हा टी-२० क्रिकेट सामन्यातील पॉवर प्लेमधील फटकेबाजी सारखाच खेळावा लागणार आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांमध्ये देखील स्वतंत्र लढायचे किंवा आघाडी करायची याबाबत कोणतीही सूत्र ठरलेले नाही. अशा परिस्थितीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत विजयाचे लक्ष दूरच, पण किमान निवडणुकीला सामोरे कसे जायचे, याचेच मोठे आव्हान विरोधकांपुढे असणार आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये पक्षामध्ये इन्कमिंगचा जोरदार तडाखा लावून भारतीय जनता पक्षाने सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे लढण्यासाठीची आपली तयारी पूर्ण केली आहे. त्याच वेळेस आपल्या सहकारी पक्षांना, म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या गटांना कोणतेही थेट आश्वासन न देता झुलवत ठेवले आहे. महायुती करायची असे एकीकडे म्हणताना दुसरीकडे महायुतीला सुरुंग लावणाऱ्या अनेक मुत्सद्दी चाली भारतीय जनता पक्षाने खेळल्या आहेत. ठाणे जिह्यात भारतीय जनता पक्षाने केलेले इनकमिंग हे त्यापैकीच एक. अशा परिस्थितीत टी-२० सामन्याप्रमाणे अतिशय मोजकेच दिवस हातामध्ये देऊन भारतीय जनता पक्षाने आपल्याच महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना खिंडीत गाठले आहे, असे निरीक्षण राजकीय वर्तुळातून नोंदवण्यात येत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने भारतीय जनता पक्षावरील दबाव कायम राखत प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये भाजप खालोखाल सर्वाधिक जागा पटकावण्यासाठी आपले वाटाघाटीचे धोरण रेटून ठेवले आहे. त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला फारशी संधी मिळालेली नाही. त्यामुळेच, पुणे पिंपरी-चिंचवड असे पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांचा बालेकिल्ला आपल्या तावडीतून सुटू नये यासाठीच राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावल्याचे समजते. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्याची गरज नाही, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातून उमटला असल्याचे समजते. महाविकास आघाडी कोणत्या महापालिका क्षेत्रांमध्ये कुठे होणार आणि कुठे नाही यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि यांच्यामध्ये कोणतीही एकवाक्यता नाही. दुसरीकडे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची निवडणुकीसाठीची युती जाहीर होणार का? जाहीर होणार असल्यास ती कधी होणार? या प्रश्नांची देखील अजून कोणतीही ठोस उत्तरे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीत विजयाचे लक्ष दूरच, पण किमान निवडणुकीला सामोरे कसे जायचे, याचेच मोठे आव्हान विरोधकांपुढे उभे ठाकले आहे.
२०१७ मध्ये महापालिकेतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडीत काढत भाजपने विक्रमी ९८ जागा जिंकत सत्ता मिळविली. त्यानंतर शहरात झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतही भाजपचेच वर्चस्व राहिले. आता महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांचा सामना भाजपशी होणार असल्याचे स्पष्ट झाले. गत महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ९८ जागा जिंकल्या होत्या, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने ४१, शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी १०, मनसेने २ आणि एमआयएम १ अशा पद्धतीचे संख्याबळ होते. आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपचा या सर्व पक्षांशी सामना असणार आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली. आता या दोन्ही पक्षांचे उमेदवार महापालिका निवडणुकीत पुन्हा एकमेकांच्या आमने-सामने येतील. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या मतदारांची विभागणी होऊन त्याचा फायदा पुन्हा भाजपला होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी पवार, काँग्रेस आणि उबाठा गट यांची आघाडी निश्चित आहे. या तीनही पक्षांत जागा वाटप कसे होणार याबाबत उत्सुकता आहे. प्रामुख्याने वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पवार गटाला अधिकाधिक जागा मिळतील अशी शक्यता आहे, तर पुणे पॅन्टोन्मेंट, कसबा पेठ या मतदारसंघातील काही भागांत काँग्रेस आणि शिवसेना यांची ताकद आहे. त्यामुळे या मतदारसंघात या दोन्ही पक्षांना जागा मिळतील, अशी शक्यता आहे.
- प्रतिनिधी