मोहित सोमण:सकाळच्या सत्रात शेअर बाजाराने 'कमबॅक' केले आहे विशेष महत्वाची वाढ म्हणजे युएसमधील पेरोल डेटातील लक्षणीय आकडेवारीनंतरही बाजाराने तेजी दर्शविली आहे ही भारतीय शेअर बाजारातील फंडामेटल तेजीचे संकेत देते. सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाल्याने सेन्सेक्स २०० अंकाने व निफ्टी ४७.९० अंकांने उसळला आहे. पीएसयु बँक, आयटी शेअर्समध्ये झालेल्या रॅलीसह मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये सुधारणा झाल्याने बाजारात वाढ झाली. सलग चार सत्रातील घसरणीनंतर व कालच्या नफा बुकिंगनंतर घरगुती गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवल्याचे संकेत दिसत आहेत. अधोरेखित बाब म्हणजे सकाळच्या सत्रात रूपयाने मोठ्या प्रमाणात रिकव्हरी केल्याने त्याचाही फायदा बाजारात झाला. मात्र बँक, फायनांशियल सर्विसेस, केमिकल्स, रिअल्टी शेअरमधील घसरणीचा किरकोळ फटका बाजारात बसला.
काल युएसने आपला नॉन फार्म पेरोल आकडेवारी जाहीर केली आहे. नोव्हेंबरपर्यंत युएसने केवळ ६४००० नोकऱ्या निर्माण केल्याने बाजारातील गुंतवणूकदारांवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला. सप्टेंबर २०२१ नंतर युएसमधील बेरोजगारीत ४.६% वर सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यामुळे काल युएस बाजार संमिश्र स्थितीत बंद झाला. डाऊ जोन्स (०.१४%), नासडाक (०.३३%) बाजारात वाढलेल्या गुंतवणूकीने किरकोळ वाढ झाली असून एस अँड पी ५०० (०.१४%) बाजारात किरकोळ घसरण झाली. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या सत्रात आज जपानच्या मजबूत आकडेवारीचा परिणाम म्हणून गिफ्ट निफ्टी (०.०५%) सह जवळपास सगळ्याच निर्देशांकात वाढ झाली आहे. अपवाद म्हणून स्ट्रेट टाईम्स (०.२६%) निर्देशांकात घसरण झाली.
आज सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ रिलायन्स पॉवर (४.२५%), इंद्रप्रस्थ गॅस (४.०१%), महानगर गॅस (३.५६%), इ क्लर्क सर्विसेस (२.७७%), सीजी पॉवर (२.५२%), हिंदुस्थान झिंक (२.०९%), श्रीराम फायनान्स (२.०७%), एबी रिअल इस्टेट (१.९७%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण एकझो नोबल (१३.२१%), पॉलिकँब (३.७२%), एचबीएल इंजिनिअरिंग (२.५६%), केईआय इंडस्ट्रीज (२.०८%), विशाल मेगामार्ट (१.७६%), निवा बुपा हेल्थ (१.७४%), डेटा पँटर्न (१.६०%) समभागात झाली आहे.
आजची गुंतवणूकदारांसाठी स्ट्रॅटेजी काय?
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'रुपया आणि कच्च्या तेलातील अलीकडील तीव्र घसरणीने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. चीन आणि अमेरिकेकडून मागणी कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट ही भारताच्या स्थूल आर्थिक स्थितीसाठी चांगली बातमी आहे, जी आधीच अनुकूल परिस्थितीत आहे. तथापि, रुपयातील सततची घसरण परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (FII) निधीचा बहिर्वाह वाढवत आहे, ज्यामुळे बाजाराला फटका बसत आहे. रुपयाच्या या प्रकारच्या तीव्र अवमूल्यनाची अपेक्षा नव्हती, विशेषतः नोव्हेंबरच्या व्यापार आकडेवारीनुसार व्यापार तूट ऑक्टोबरमधील ४१.५ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत २४.५ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले होते. रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप न करण्यामागे एक संभाव्य कारण हे आहे की, रुपयाच्या अवमूल्यनामुळे अर्थव्यवस्थेला नुकसान होत नाहीये. नोव्हेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर केवळ ०.७१% असल्याने, आयातित महागाईचा कोणताही धोका नाही. दुसरीकडे, रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारताच्या निर्यातीला चालना मिळत आहे, ज्यावर ट्रम्प यांच्या काळात लावलेल्या शुल्कांचा परिणाम झाला होता.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व्यापारातील सध्याच्या कमकुवतपणामुळे, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार २०२६ मध्ये कधीतरी भारतात खरेदीदार बनण्याची शक्यता आहे. यासोबतच, जर अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करार झाला, तर परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार भारतात खरेदीदार बनतील. २०२६ च्या पहिल्या सहामाहीत रुपया मजबूत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सध्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे शेअरच्या किमती घसरत असल्या तरी, गुंतवणूकदारांनी २०२६ मधील तेजीच्या अपेक्षेने खरेदी करावी.'
टेक्निकल आऊटलूक -
आजच्या बाजारातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,' कालचे तेजीचे प्रयत्न प्रभावी मंदीच्या प्रवाहावर मात करण्यासाठी खूपच कमकुवत होते. परंतु २५८५० पर्यंत घसरल्यानंतर, आता तेजीच्या प्रयत्नांना यशस्वी होण्याची अधिक चांगली संधी आहे. आज आम्ही २५९८० पातळीच्या अपेक्षेने बाजारात प्रवेश करू, आणि त्या पातळीच्या पलीकडील कोणत्याही वाढीकडे बाजारातील मजबुतीची चिन्हे म्हणून पाहिले जाईल. याउलट, सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर २५८५० पातळीच्या वर टिकून राहण्यात अपयश आल्यास, २५६५०-३०० पातळीपर्यंतच्या पुढील घसरणीचे संकेत मिळू शकतात.'






