दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
पट्मादेवी
भारतातील असंख्य आईसारखं तिला देखील वाटायचं आपल्या मुलांनी पोषक आहार घ्यावा. पोषक आहाराच्या सेवनाने आपली मुले सुदृढ असावीत. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते शक्य नव्हतं. त्यात हा प्रदेश डोंगराळ. ना शेती करू शकत ना कोणती नोकरी. पण एक व्यवसाय तिला खुणावत होता तो म्हणजे दुग्धव्यवसाय. मात्र तो कसा सुरू करायचा हे काही ठाऊक नव्हतं. मात्र हाच तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. आपल्यासारख्या गरजू स्त्रियांना तिने एकत्र आणले. बचत गट स्थापन केला. त्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. ही गोष्ट आहे उत्तराखंडच्या पट्मादेवीची.
उत्तराखंडच्या डोंगराळ राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील बजलरी गावात आपले पती आणि मुलांसह पट्मादेवी राहते. २०१० मध्ये तिच्यासह नऊ जणांनी एकत्र येऊन एक बचत गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटले की, बचतगटाच्या माध्यमातून काही उपक्रम सुरू करणे उपयुक्त ठरेल. ज्यामुळे त्यांना उत्पन्न मिळू शकेल. आता या सगळ्याजणी उत्तराखंडमधील एक प्रमुख दूध पुरवठादार कंपनी असलेल्या आंचल डेअरीचे सदस्य आहेत.
आंचल डेअरीची सुरुवात हिमालयन अॅक्शन रिसर्च सेंटर (एचएआरसी)च्या मदतीने करण्यात आली. एचएआरसी ही डेहराडून-स्थित एक स्वयंसेवी संस्था आहे. बजलारी, पमाडी, नारियुम्का आणि मांडा या चार गावांमधील एकूण ४० महिला दुग्ध व्यवसायात उतरल्या. पट्माच्या गावातून, त्यांच्या बचत गट सदस्यांसह १६ महिला आंचल डेअरीमध्ये सामील झाल्या. त्यांनी एचएआरसीद्वारे मदत केलेल्या स्थानिक बँकेकडून कर्ज घेतले. सुरुवातीला, बँकेने प्रत्येकी १५,००० रुपयांचे कर्ज दिले. जर या महिलांनी ही रक्कम निर्धारित वेळेत परत केली, तर त्यांना अधिक पैसे दिले जातील अशी अट देखील घातली गेली. या महिलांनी १५ महिन्यांमध्ये दरमहा १,००० रुपये परत केले. आठ महिला सदस्यांनी कर्ज घेतले होते. प्रत्येकीने संपूर्ण कर्जाच्या रकमेतून एक गाय खरेदी केली होती.
जानेवारी २०११ मध्ये या महिलांनी दुसरे कर्ज घेतले. यावेळी कर्जाची रक्कम होती ३०,००० रुपये. पुन्हा एकदा, प्रत्येक महिलेने एक गाय खरेदी केली. पट्माची पहिली गाय एका दिवसात सुमारे आठ लीटर दूध देत असे. यापैकी तीन लीटर ती कुटुंबासाठी ठेवत असे तर उरलेले पाच लीटर दूध १८-२० रुपये प्रति लीटर दराने ती विकत असे. पट्माची सहकारी सदस्या सारदा देवीचा अनुभव बोलका आहे. ती म्हणते, “माझ्यासारख्या ज्या महिलांना पूर्वी उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता, त्यांच्यासाठी औषधे खरेदी करणे, घर दुरुस्ती करणे, मुलांच्या शाळेची फी आणि कपडे यांसारख्या घरगुती खर्चासाठी दूध विकून मिळणारे पैसे खूप उपयुक्त ठरतात.” हा दुग्ध उपक्रम एचएआरसीच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्यामुळे ग्रामीण महिला शेतकऱ्यांना पर्यायी रोजगाराचे मार्ग निर्माण होतात. गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे त्यांच्या जमिनीतून कमी उत्पन्न मिळत आहे.
२०११ मध्ये, या स्वयंसेवी संस्थेने जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना सूक्ष्म उद्योगांसाठी संधी निर्माण करण्यास मदत केली, ज्यामध्ये दुग्ध व्यवसाय, फुलशेती, शिवणकाम, विणकामासाठी हस्तकला यासाठी विविध स्वयं सहाय्यता गट स्थापन केले.
एचएआरसीचे महेंद्र सिंह कुंवर यांना समजले की, समाजात महिलांचा सामाजिक दर्जा कमी आहे. त्याविषयी जागरूकता सुद्धा कमी होती. याउलट पुरुषांचे रोख रकमेवर नियंत्रण होते. म्हणून, महेंद्र कुंवर यांनी गट व्यवस्थापन, संघर्ष निराकरण, निर्णय घेणे, आर्थिक व्यवस्थापन, सूक्ष्म उद्योग विकास आणि विपणन कौशल्ये या विषयांमध्ये कठोर क्षमता बांधणी प्रशिक्षणाद्वारे महिला गटांचे संघटन आणि बळकटीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.
महिलांना सुलभ ठिकाणी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या प्रक्रिया युनिट्समध्ये प्रशिक्षण देण्यात आले. १९६ महिलांच्या मुलाखतींवर आधारित एचएआरसीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जेव्हा महिलांनी बँकांमध्ये गट कर्जासाठी अर्ज केला तेव्हा त्यांना कर्ज मिळणे सोपे झाले. आकडेवारीवरून असेही दिसून येते की, महिलांच्या कर्जाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे त्यांचे आर्थिक योगदान घरगुती पातळीवर दिसून आले आहे. आता या महिला कुटुंबाच्या विविध आर्थिक उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत.
कोणी घर बांधण्यासाठी पुढाकार घेत आहे, कोणी मुलांचे लग्न करून देत आहे. कोणी महिला आपल्या मुलाला किंवा आपल्या जोडीदाराला दुकान व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करत आहे, तर काहीजणी आपल्या कुटुंबाची आरोग्य सेवा आणि मुलांचे शिक्षण पाहत आहे. काही महिलांनी तर स्वत:चे व्यवसाय सुरू केले आहेत. आज पट्मा देवीची मुले शाळेत जाण्यापूर्वी पराठे- दूध असा पोषक आहार घेतात. चांगल्या शाळेत जातात. खरं तर शहरातील लोकांना ही कामगिरी क्षुल्लक वाटेल. मात्र अनेक पिढ्या घरचा उंबरठा न ओलांडलेल्या महिलांसाठी स्वतःच्या पायावर उभे राहणे ही क्रांतिकारी गोष्ट आहे. पट्मा देवी आणि तिच्या महिला सहकारी सर्वार्थाने लेडी बॉस आहेत.