Wednesday, December 17, 2025

मुलांच्या आरोग्याशी खेळ?

मुलांच्या आरोग्याशी खेळ?

विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी सांडपाणी दिल्याचा आरोप

ठाणे : दिव्यातील मातोश्रीनगर परिसरातील एका खासगी शाळेत लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ड्यू ड्रॉप या शाळेत बाथरूमसाठी चक्क गटाराचे पाणी वापरले जात असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. काही पालकांनी दिवा मनसेच्या महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे शाळेत सांडपाणी वापरले जात असल्याची तक्रार केली होती. तक्रारीची खात्री करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शाळेला भेट दिली असता, हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला. यानंतर शाळा संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी या घटनेचे व्हिडीओ पुरावे ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांच्या निदर्शनास आणून दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्काळ पाहणीसाठी शिक्षण विभागाचे पथक पाठवण्यात येईल, असे उपायुक्तांनी सांगितल्याचे मनसेने नमूद केले. दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी सांगितले की, “पालकांच्या तक्रारीनंतर पाहणी केली असता ही धक्कादायक बाब समोर आली. याप्रकरणी शिक्षण विभागाने नेमकी कोणती कारवाई केली, याची माहिती घेण्यासाठी महापालिकेत जाऊन पाठपुरावा केला जाईल.”

आरोप फेटाळले :

दरम्यान, ड्यू ड्रॉप शाळेचे संचालक उत्तम सावंत यांनी हे आरोप फेटाळले आहेत. “२०१५ मध्ये शाळेला मान्यता मिळाली असून येथे सुमारे ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली त्या वेळी ठाणे महापालिकेच्या नळाला नियमित पाणी होते. आमच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. शिक्षण विभागानेही शाळेची पाहणी केली आहे. तरीही असे आरोप का करण्यात आले, हे समजत नाही,” असे सावंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment