Wednesday, December 17, 2025

राज्यातली महाविकास आघाडी संपली?

राज्यातली महाविकास आघाडी संपली?

शरद पवार गटही महायुतीचा भाग; अमित शहांकडून 'एनओसी'

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून शरद पवार गटाशी युती करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळवल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे अस्तित्व संपल्यात जमा झाले आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रियाही या ‘प्रमाणपत्रा’मुळे वेग घेईल, असा त्या पक्षातील नेत्यांचा दावा आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीत सामील होण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, तेव्हा अनेकजण पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावरील निष्ठेपोटी मूळ पक्षात राहिले होते. परंतु, वयोमानाने खुद्द पवार यांनाच पूर्वीच्या जोशात राजकारण करणे शक्य नाही आणि त्यांच्याशिवाय पक्ष प्रभावीपणे चालवेल, असा दुसरा नेता पक्षात नसल्याचे त्या निष्ठावानांना आता कळून चुकले आहे. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेत असल्याने त्यांच्या पक्षात चांगलाच जिवंतपणा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादींनी स्थानिक पातळीवर समझोता करून निवडणूक लढवावी आणि त्याद्वारे शरद पवार गटातील निष्ठावानांनी स्वतःला अजित पवार गटाशी जोडून घ्यावे, अशी प्रक्रिया गेला महिनाभर राज्यात सर्वत्र सुरू आहे. तिला मंगळवारी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शहा यांच्याकडून मान्यता मिळवली. शरद पवार यांचे राजकारण या मार्गाने संपते आहे, हे या दोघांनीही शहा यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते.

व्यक्तिशः शरद पवार यांच्याशिवाय त्या गटातील इतरांना सामावून घेण्याबाबत अजित पवार गटात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. या गटाला जोडून घेतल्यास आणि त्यात खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश असल्यास केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी प्राधान्याने लागेल म्हणूनही काहींचा या एकत्रिकरणाला विरोध आहे. राज्य पातळीवरही त्या गटातील नेत्यांना सत्तेत पदे द्यावी लागतील. हे वाटेकरी कशासाठी वाढवायचे? असा काहींचा प्रश्न असल्याचे समजते. मंगळवारी शहा यांनी दिलेल्या मान्यतेने मात्र आता ही प्रक्रिया कोणी फार काळ रोखू शकणार नाही. ती पूर्ण होईलच, असेही काहींचे म्हणणे आहे. सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी रात्री शहा यांची भेट घेतली. त्यांना शहा यांनी बराच वेळ दिला, याकडे हा गट लक्ष वेधतो. या घडामोडीत महापालिका निवडणुकांमध्ये मविआ हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

काँग्रेसला आता ‘एकला चलो रे’

दुसऱ्या बाजूला उबाठा आणि मनसे यांची युती नक्की झाली आहे. त्या दोन पक्षांच्या बोलण्यावेळी उबाठाने काँग्रेसला कुठेच गृहीत धरलेले दिसत नाही. काँग्रेसने मनसेच्या महायुतीतील समावेशाला तीव्र विरोध केल्याने उबाठाने नंतर त्यांचा नाद सोडल्याचे उबाठातून सांगण्यात येते. काँग्रेसला त्यामुळे महापालिका निवडणुकांना आता एकट्यानेच सामोरे जावे लागेल. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी 'एकला चलो'चे नारे नगर परिषद-नगरपंचायत निवडणुकीवेळीच दिले होते. त्यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण होणार असली तरी महाविकास आघाडी मात्र यामुळे राज्यातून कायमची संपते आहे.

Comments
Add Comment