प्रा. जयसिंग यादव
भारतासोबतच्या संबंधांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तुर्की इतर देशांशीही संबंध मजबूत करत आहे. पाकिस्तानला तुर्कीचा पाठिंबा सर्वश्रुत असला, तरी बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, मालदीवसारख्या देशांमध्ये त्याचा वाढता प्रभाव भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. या प्रयत्नांना तोंड देण्यासाठी भारत ग्रीस, सायप्रस आणि अर्मेनियासारख्या तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्यांशी आपली भागीदारी मजबूत करण्यावर भर देत आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील शंभरहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. जगभरांतून पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. फक्त तुर्कस्तानसह काही मूठभर पाकिस्तानधार्जिण्या देशांचा काय तो अपवाद. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी तुर्कस्तानने पाकिस्तानला ड्रोन पुरवले. तेव्हापासून भारत आणि तुर्कीमधील संबंधांमध्ये बिघाड वाढला. पाकिस्तानने या संघर्षादरम्यान भारतीय लष्करी तळ आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य करण्यासाठी तुर्कीने पुरवलेल्या ड्रोनचा वापर केला. या ड्रोनमध्ये असीस्गार्ड आणि सोंगर सारख्या मॉडेल्सचा समावेश होता. नंतर भारताने या मुद्द्यावर तुर्कीकडे चिंता व्यक्त केली. तुर्की गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानला एफ-१६ फायटिंग फाल्कन जेट आणि बायरक्तर ड्रोन पुरवत आहे. तुर्की हा केवळ पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश नाही, तर त्याच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. भारतासाठी दीर्घकाळापासून चिंता असलेल्या काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला त्याने सातत्याने पाठिंबा दिला आहे. लष्करी उपकरणे पुरवण्याव्यतिरिक्त तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी मे महिन्यातील संघर्षादरम्यान पाकिस्तानला समर्थन दिले. या तणावातच भारत २९ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे आयोजित तुर्कीच्या राष्ट्रीय दिन समारंभापासून दूर राहिला. त्यानंतर लगेचच मीडिया रिपोर्टसनुसार, नोव्हेंबरमध्ये, तुर्कीने अमेरिकेची अपाचे हेलिकॉप्टर भारताला मिळण्यातही अडथळा आणला. त्यांना त्यांच्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्याची परवानगी नाकारली.
भारताच्या शेजाऱ्यांसोबत तुर्कीच्या वाढत्या संरक्षण कारवाया हिंदी महासागर प्रदेशावरील वाढत्या लक्षाचे प्रतिबिंब आहेत. भारताच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये सत्तेवरून घालवल्यानंतर तुर्कीने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारशी लष्करी संबंध अधिक मजबूत केले आहेत. ३ नोव्हेंबर रोजी तुर्कीच्या संसदीय शिष्टमंडळाला भेटल्यानंतर, युनूस म्हणाले की, बांगलादेश आपल्या लोकांसाठी नवीन संधी उघडण्यासाठी तुर्कीसोबत काम करण्यास तयार आहे. बांगलादेश तुर्कीकडून अनेक लष्करी उपकरणे खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. त्यात बायरक्तार टीबी-२ ड्रोन, टीआरजी-३०० रॉकेट सिस्टीम आणि ओटोकर तलपर लाईट टँक यांचा समावेश आहे. लष्करी बातम्या देणाऱ्या बांगलादेशी वेबसाइटनुसार, बांगलादेश तुर्कीकडून ‘शिपर’ लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा विचार करत आहे. काही भारतीय माध्यमांच्या वृत्तांनुसार, वाटाघाटी आधीच सुरू आहेत. बांगलादेश पारंपरिकपणे शस्त्रास्त्रांसाठी चीनवर अवलंबून राहिला असला, तरी तो आता तुर्कीकडून शस्त्रे खरेदी करत आहे. बांगलादेश २०२२ मध्ये तुर्कीचा सर्वोच्च शस्त्रास्त्र खरेदीदार बनला.
बांगलादेशसोबतच्या वाढत्या मैत्री संबंधामुळे तुर्कीला बंगालच्या उपसागरात एक धोरणात्मक उपस्थिती मिळाली आहे. त्यामुळे काळ्या समुद्रापासून हिंदी महासागरापर्यंत त्याचा प्रभाव वाढतो. नोव्हेंबर २०२३ मध्ये मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर इस्तंबूलला पहिली भेट दिली. त्यानंतर मालदीव या आणखी एका हिंदी महासागरीय राष्ट्राशी तुर्कीने सहकार्य वाढले. यावर्षी मार्चमध्ये तुर्कीने मालदीवला स्वदेशी विकसित सशस्त्र ड्रोन दिले. त्यानंतर एप्रिलमध्ये तुर्कीने एक जुने नौदल जहाजदेखील भेट दिले. यापूर्वी, जानेवारी २०२४ मध्ये मालदीवने त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्राचे निरीक्षण करण्याची घोषणा केली. तुर्कीकडून लष्करी ड्रोन खरेदी करण्यासाठी ३७ दशलक्ष डॉलरचा करार करण्यात आला. २२ ते २७ जुलैदरम्यान इस्तंबूल येथे झालेल्या संरक्षण मेळाव्यात तुर्कीने भारताच्या आणखी एका शेजारी देशाशी, श्रीलंकेशी सहकार्य करार केला. जूनच्या सुरुवातीला तुर्की नौदल युद्धनौका कोलंबोमध्ये बंदिस्त होती. श्रीलंकेने तिचे वर्णन ‘वाढत्या संरक्षण सहकार्याचे प्रतीक’ असे केले होते. गेल्या आठवड्यात जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लोरेन्को यांच्याशी हस्तांदोलन केले आणि एर्दोगान यांनी जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याशी हस्तांदोलन केले; परंतु मोदी आणि एर्दोगन यांच्यात एकाच व्यासपीठावर असूनही राजशिष्टाचार म्हणूनही हस्तांदोलन झाले नाही. या देहबोलीतून दोन देशांमधील बिघडलेल्या संबंधाचे चित्र स्पष्ट होत होते.
भारतीय माध्यमांच्या एका गटाचे म्हणणे आहे की, लष्करी सहकार्य मजबूत करण्याव्यतिरिक्त तुर्की भारताच्या शेजारी आपली गैर-लष्करी उपस्थिती आणि प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑगस्ट २०१९ मध्ये आशियाई देशांसोबत सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने ‘आशिया : एक नवीन उपक्रम’ची घोषणा केली. तुर्कीच्या सरकार समर्थक येनी सफाक वृत्तपत्रात २९ मे रोजी प्रकाशित झालेल्या एका वृत्तात असेही म्हटले आहे की, दक्षिण आशियातील तुर्कीचा वाढता प्रभाव भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. ‘फर्स्ट पोस्ट’ या भारतीय वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका भाष्यात म्हटले आहे की, एर्दोगान इस्लामिक जगाचा नेता बनण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान हा तुर्कीचा कनिष्ठ भागीदार असून यातील वैचारिक स्पर्धेत सहभागी आहे. तुर्की बांगलादेशमध्ये अनेक उच्चस्तरीय संवादांमध्ये सक्रिय आहे. यामध्ये इस्लामी पक्ष ‘जमात-ए-इस्लामी’शी संपर्कदेखील समाविष्ट आहे. भारतीय गुप्तचर सूत्रांचा हवाला देत सीएनएन-न्यूज१८ च्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, तुर्की गुप्तचर संस्था बांगलादेशमधील इस्लामी गटांना, विशेषतः कट्टरपंथी ‘जमात-ए-इस्लामी’ला आर्थिक आणि लॉजिस्टिक सहाय्य करत आहे. तुर्की त्यांच्या ‘टीआयकेए’ या सरकारी मदत एजन्सीद्वारे बांगलादेशमधील रोहिंग्या निर्वासितांना महत्त्वपूर्ण मदत करत आहे.
नेपाळमध्ये तुर्की सरकारच्या निधीतून चालणाऱ्या ‘आयएचएच’ या स्वयंसेवी संस्थेने कार्याचा विस्तार केला आहे. ते अल्पसंख्याक मुस्लीम लोकसंख्येसाठी मशिदी, मदरसे आणि इस्लामिक केंद्रांच्या बांधकामासाठी निधी देत आहे. तुर्कीची कार्यपद्धती दुहेरी असल्याचे दिसून येते. ती वैचारिक प्रभावासाठी मानवतावादी संपर्काचा वापर करत असतानाच राजकीय किंवा धोरणात्मक हेतूंसाठी वापरता येणारे आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करत आहे. भारतीय मुख्य प्रवाहातील माध्यमांनी सूचित केले आहे की, भारत सरकार तुर्कीचे प्रतिस्पर्धी ग्रीस, सायप्रस आणि आर्मेनिया यांच्याशी भागीदारी करण्यावर पुन्हा भर देत आहे. दक्षिण आशियाच्या सुरक्षा क्षेत्रात तुर्कीचा अनपेक्षित प्रवेश भारताला असणाऱ्या धोक्याच्या गणितात बदल घडवत आहे. तुर्की आता दूरचा निरीक्षक राहिलेला नाही. तो सक्रिय अडथळा निर्माण करणारा देश बनला आहे. ‘आयएनएस त्रिकंद’ने १७-१८ सप्टेंबर रोजी ग्रीक नौदलाच्या जहाजांसह नौदल सराव केला. २४ सप्टेंबर रोजी सायप्रस नौदलासोबत असाच एक सराव झाला. हे संयुक्त सराव तुर्कीसाठी अडचणी निर्माण करू शकतात. शेजारी ग्रीसशी तुर्कीचे दीर्घकाळापासूनचे वैर आहे. तुर्कीच्या प्रतिस्पर्ध्यांसोबत नौदलाच्या सहभागाचा संदर्भ देत भारत पूर्व भूमध्यसागरीय आणि दक्षिण काकेशसमध्ये निर्णायकपणे आपली उपस्थिती दर्शवत आहे, तो तुर्कीच्या प्रादेशिक प्रभावाला धोरणात्मक प्रतिसाद देण्याचे संकेत देतो, असे एका वृत्तात म्हटले आहे.
तुर्की आणि भारताचे व्यापारी संबंध मध्यम स्वरूपाचे आहेत; परंतु अलीकडेच तुर्कीविरुद्धच्या निदर्शनांमुळे आणि प्रवास निर्बंधांमुळे यावर परिणाम झाला आहे. भारतातील तुर्की गुंतवणुकीचाही आढावा घेतला जात आहे. राष्ट्रीय हितसंबंधांवर परिणाम झाल्यास तुर्की कंपन्यांना प्रकल्पांमधून काढून टाकले जाऊ शकते. सायप्रसच्या उत्तरेकडील भागावरील नियंत्रणावरून तुर्कीशी संघर्ष करणाऱ्या सायप्रसच्या सार्वभौमत्वाला आणि एकतेला भारत पाठिंबा देतो. त्यामुळे दोन देशांच्या व्यूहरचना परस्परांना शह-काटशह देणाऱ्या आहेत, हे स्पष्ट होते.