गर्भवती महिलेला जीवदान ; आई आणि बाळाची सुखरुप सुटका
कर्जत : रेल्वेचा प्रवास… रात्रीची वेळ… अचानक एका गर्भवती महिलेच्या वेदनांचे आवाज येत होते. सोलापूर-मुंबई धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये घडलेला हा प्रसंग केवळ वैद्यकीय नव्हे, तर माणुसकीचा जिवंत दाखला ठरला आहे. सोलापूर मधील एका महिलेने धावत्या एक्सप्रेसमध्येच कन्यारत्नाला जन्म दिला. सोलापूर जिल्ह्यातील सोरेगाव येथील गर्भवती महिला दीक्षा बनसोडे ठाणे येथे येण्यासाठी सोलापूरहून निघाल्या होत्या. पुणे नंतर कर्जत स्थानक सोडल्यानंतर अचानक त्या महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर होत चालली होती. घाबरलेल्या प्रवाशांमध्ये एकच प्रश्न होता. आता काय?
या डब्यात प्रवास करणारे सायन येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रशांत बोडगे यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढाकार घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी रेल्वे हेल्पलाईनशी संपर्क साधला. नेरळ स्थानकात कर्तव्यावर असलेले रणजीत शर्मा यांनीही प्रसंगाचे गांभीर्य ओळखत तात्काळ समन्वय साधला. दरम्यान महिलेला वेदना इतक्या वाढल्या, की स्थानकावर उतरणे शक्यच नव्हते. ट्रेन कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानक दरम्यान असताना क्षणभरही न डगमगता इथेच प्रसूती करावी लागेल असा निर्णय डॉक्टरांनी घेतला. रेल्वेच्या त्या चालत्या डब्यात, मर्यादित साधनांमध्ये प्रचंड ताणतणावात एक गोंडस कन्यारत्न जन्माला आले. प्रसूतीनंतर आई व बाळ दोघांनाही नेरळ स्थानकात उतरून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण प्रसंगात डॉक्टरांची तत्परता, धैर्य आणि माणुसकी खऱ्या अर्थाने 'देव' ठरली. रेल्वे प्रशासन, स्थानक व्यवस्थापक आणि डॉक्टर यांच्यातील समन्वयामुळे मोठा अनर्थ टळला. प्रसूती झालेल्या महिलेचे व बाळाचे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील महिला डॉक्टर संगीता मेंढी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आले. यानंतर महिलेला व बाळाला त्यांच्या कुटुंबासोबत ठाणे येथे पाठवण्यात आले.






