Wednesday, December 17, 2025

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून दिला जाणारा पहिला ‘शांतिब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार’ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात येत असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.

ऐतिहासिक सोहळा आणि पुरस्कार वितरण हा पुरस्कार सोहळा दिनांक ९ मार्च २०२६ रोजी, श्रीक्षेत्र पैठण येथे नियोजित आहे. या दिवशी संत श्री एकनाथ महाराजांचा पावन समाधी सोहळा (नाथषष्ठी) असल्याने पैठणमध्ये भक्तीचा महापूर लोटलेला असतो. याच भक्तीमय वातावरणात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संत श्री एकनाथ महाराज संस्थान आणि संत एकनाथ महाराज पालखी सोहळा समिती यांनी एका अधिकृत पत्राद्वारे या पुरस्काराची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, संस्थान व पालखी सोहळा समिती यांच्या वतीने दिला जाणारा हा पहिलाच पुरस्कार असून, त्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या सन्मानाने होत आहे, ही विशेष बाब मानली जात आहे.

वारकरी सेवेचा गौरव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राची संत परंपरा आणि अध्यात्मिक क्षेत्राच्या वाढीसाठी सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थानने त्यांची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड केली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सुमारे पाच लाखांहून अधिक वारकरी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वीही मिळाले आहेत मानाचे पुरस्कार वारकरी संप्रदायाकडून एकनाथ शिंदे यांचा गौरव होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांना ‘भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार’ आणि ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. आता पैठण संस्थानच्या या पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा