चार मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश
नवी मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. अवघ्या एका महिन्यात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या हालचालींनाही वेग आला असून, अनेक नेते आपली राजकीय भूमिका बदलताना दिसत आहेत.
निवडणुका जाहीर होताच नवी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी (एम. के. मढवी) यांच्यासह तीन नगरसेवक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एम. के. मढवी यांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक ठाकरे गटाकडून लढवली होती. गणेश नाईक आणि विजय चौगुले यांच्याविरोधात ते मैदानात उतरले होते; मात्र त्यांचा पराभव झाला होता. सध्या मढवी हे ऐरोली–बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख असून, ऐरोली मतदारसंघात त्यांचा चांगला जनाधार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे. आता ते आपल्या कुटुंबीयांसह शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यांच्यासोबत पत्नी विनया मढवी, मुलगा करण मढवी, तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका पूनम पाटील व त्यांचे पती मिथुन पाटील यांचाही समावेश आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना सलग दोन दिवसांत दोन मोठे धक्के बसले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वॉर्ड क्रमांक १ मधील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.






