नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इथिओपिया देशाने ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित केले आहे. मोदींना मिळालेल्या हा मोलाच्या आंतरराष्ट्रीय सन्मानाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणारे पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले राष्ट्रप्रमुख किंवा सरकार प्रमुख बनले आहेत. या सन्मानासह पंतप्रधान मोदींना आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून मिळालेल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांची संख्या २८ वर पोहोचली आहे.
हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान इथियोपियाकडून मिळालेला सर्वोच्च सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त करत सांगितले की, “हा माझा वैयक्तिक सन्मान नसून १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. मी सर्व भारतीयांच्या वतीने हा सन्मान अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो.” हा सन्मान भारत-इथियोपिया भागीदारी घडवून आणणाऱ्या असंख्य भारतीयांचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
I’m honoured to be conferred with the ‘Great Honour Nishan of Ethiopia.’ I dedicate it to the 140 crore people of India. https://t.co/qVFdWQgU9r
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2025
ग्लोबल साऊथमध्ये इथियोपियाची प्रेरणादायी भूमिका पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज संपूर्ण जगाचे लक्ष ग्लोबल साऊथकडे लागलेले असताना, इथियोपियाची स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि आत्मगौरवाची चिरकालीन परंपरा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्य त्याच भागीदाऱ्यांचे असते, ज्या विश्वास आणि दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असतात, असेही त्यांनी नमूद केले.
भारत-इथियोपिया सहकार्य बळकट होणार भारत इथियोपियासोबत असलेले सहकार्य पुढे नेण्यास कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले, जे बदलत्या जागतिक आव्हानांवर उपाय देईल आणि नव्या संधींची निर्मिती करेल. विविध क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
इथियोपियात पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत जॉर्डनहून पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर इथियोपियात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींचे राजधानी अदीस अबाबा येथे औपचारिक आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांनी स्वतः विमानतळावर उपस्थित राहून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.
दोन्ही पंतप्रधानांचा एकाच गाडीतून प्रवास मैत्रीपूर्ण वातावरणाचे दर्शन घडवत, पंतप्रधान अबी अहमद अली यांनी पंतप्रधान मोदींना हॉटेलपर्यंत स्वतःच्या गाडीतून नेले. या प्रवासादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींना सायन्स म्युझियम आणि फ्रेंडशिप पार्क दाखवण्याची खास व्यवस्था केली, जी आधीच्या कार्यक्रमात समाविष्ट नव्हती.
भारतीय समुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद अदीस अबाबामध्ये पंतप्रधान मोदींच्या आगमनानंतर भारतीय समुदायाने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले. तिरंगा फडकावत ‘मोदी मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला.





