Tuesday, December 16, 2025

'तारघर' नवी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक योजनेत एक महत्त्वाचं केंद्र!

'तारघर' नवी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक योजनेत एक महत्त्वाचं केंद्र!

नवी मुंबई: मागील काही दिवसांपूर्वी नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी रेल्वे प्रशासनाने जाहीर केली होती. नवी मुंबईच्या बेलापूर–नेरूळ–उरण रेल्वे मार्गावर अतिरिक्त उपनगरीय सेवा, तसेच तारघर आणि गव्हाणे या दोन रेल्वे स्थानकांची काम करणे या दोन महत्त्वाच्या निर्णयांमुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला. महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष ठरला आहे. कारण नवी मुंबई रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेले तारघर हे नवीन स्थानक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ आहे. या स्थानकामुळे उरण मार्गावरील रेल्वे प्रवासाला नवी दिशा मिळाली असून, भविष्यात हे स्थानक विमानतळावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रमुख मार्ग ठरणार आहे.

तारघर स्टेशन हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे विमानतळ सुरू झाल्यावर या परिसरातील लोकसंख्या, व्यावसायिक वसाहती आणि प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या भागातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही पायाभूत सुविधा उभारली आहे. तसेच तारघर हे नवे स्थानक कार्यान्वित झाले आहे.

याशिवाय उरण मार्गावर आणखी एक महत्त्वाची सुविधा प्रवाशांच्या सेवेत देण्यात आली आहे. बेलापूर–नेरूळ–उरण मार्गावर लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि गर्दीच्या वेळेमध्ये प्रवास करणे अधिक सोपे आणि सुखकर होणार आहे. तारघर स्टेशन सुरू झाल्यामुळे कामोठे, उलवे, बामणडोंगरी परिसरातील रहिवाशांना थेट रेल्वे सेवेचा फायदा मिळणार आहे.

100 कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे तारघर स्टेशन अत्याधुनिक असून सर्व आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. स्थानकावर प्रशस्त प्लॅटफॉर्म, सुरक्षित प्रवेश व्यवस्था आहे. भविष्यातील प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन या स्टेशनचं डिझाइन करण्यात आलं आहे. हे स्टेशन केवळ रेल्वे स्थानक नसून, नवी मुंबईच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. या नवीन रेल्वे स्थानकामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल, अशी अपेक्षा आहे. विमानतळ, सिडकोने विकसित केलेले नोड्स आणि उरण मार्ग यांना जोडणारे तारघर स्टेशन नवी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक योजनेत एक महत्त्वाचं केंद्र ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >