मुंबई : सुप्रीम कोर्टाने सोमवारी अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांना मोठा दिलासा दिला. सहकारी संस्थेशी संबंधित फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघाताच्या प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत दोघांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने श्रेयस तळपदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, यापूर्वी दिलेले अटकपूर्व संरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.कोर्ट सध्या त्या याचिकांवरही सुनावणी करत आहे, ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल झालेल्या एफआयआर एकत्र करण्याची मागणी केली. सुनावणीदरम्यान श्रेयस तळपदे यांच्या वकिलांनी सांगितले की, अभिनेता कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमाला पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्यांचा सोसायटीच्या आर्थिक व्यवहारांशी कोणताही संबंध नव्हता, तसेच त्यांनी यातून कोणताही आर्थिक लाभ घेतलेला नाही. दरम्यान, आलोक नाथ यांच्या वकिलांनी सांगितले की, अलोकनाथ कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून संबंधित सोसायटी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या छायाचित्रांचा वापर करत असल्याचा दावाही त्यांनी केला.
एखादा अभिनेता किंवा खेळाडू जाहिरातीत दिसला असेल किंवा ब्रँड अँबेसिडर असेल, आणि संबंधित कंपनी नंतर गुन्हेगारी कृत्यात सामील असल्याचे आढळले, तर त्या व्यक्तीला जबाबदार धरता येईल का, असा सवाल न्यायालयाने केला.






