मोहाली : पंजाबमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मोहाली जिल्ह्यातील सोहाना कस्ब्यात सुरू असलेल्या बेदवान स्पोर्ट्स क्लबच्या चार दिवसीय कबड्डी स्पर्धेदरम्यान सोमवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात स्पर्धेचे आयोजक आणि कबड्डीपटू कंवर दिग्विजय सिंह उर्फ राणा बलाचौरिया यांचा मृत्यू झाला आहे.
कबड्डी स्पर्धा सुरू असतानाच मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला. राणा बलाचौरिया यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात पाच गोळ्या लागल्या. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक खेळाडू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हत्येची जबाबदारी बंबीहा गँगने स्वीकारली आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन बंबीहा गँगने जबाबदारी स्वीकारली. गँगच्या गोपी घनश्यामपुरिया याने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राणा बलाचौरिया याने सिद्धू मूसेवाला हत्येतील आरोपींना मदत केली होती. “आज राणा बलाचौरियाची हत्या करून आम्ही आमचा भाऊ सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचा बदला घेतला”
पंजाबमध्ये कबड्डीपटूंवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यंदाच्या वर्षात अवघ्या सहा महिन्यांत तीन कबड्डीपटूंची हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये सोनू नोल्टा, तेजपाल सिंग आणि आता राणा बलाचौरिया यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या हत्यांसाठी आम आदमी पक्षाच्या सरकारला जबाबदार धरले आहे. सतत घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे पंजाबमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






