लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक घटना लातूरमधून समोर आली आहे. त्याने तब्बल १२ तास कारमध्ये जळून मृत्यू झाल्याचे नाटक केले. त्याच्या या नाटकाला पोलीस सुद्धा भुलले. पण, जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा एक मेसेज आणि एका तरुणीचे कनेक्शन समोर आल्याने गणेशचा सर्व डाव उलटला आणि तो पोलिसांच्या गळाला लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवार, १३ डिसेंबर रात्री उशिराने वानवडा भागात एक कारला आग लागली. ज्यात लातूरमधील औसा तालुक्यात वानवडा इथे एका कारमध्ये ५० वर्षीय इसमाचा जळून मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलाकडून करण्यात आले. आग नियंत्रणात येताच पोलिसांनी गाडीची तपासणी केली, ज्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गणेश चव्हाण असे या तरुणाचे नाव सांगितले जात होते. पण, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मृत व्यक्ती गणेश चव्हाण ही जिवंत असल्याचे समोर आले. तसेच गणेश चव्हाणनेच आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याचे उघड झाले.
मृत्यूचा बनाव करणारे गणेश चव्हाण यांची चौकशी करताना पोलिसांना समजले की, दुपारी घरातून बाहेर गेलेले गणेश दिवसभरात परत आले नव्हते. तसेच त्यांचा मोबाईल सुद्धा बंद होता. त्यामुळे पोलीसांची अशी धारणा झाली की, कारमधील मृत व्यक्ती ही गणेश चव्हाण आहे. त्यामुळे औसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. मात्र घटनेचा तपास सुरू असताना पोलिसांना गणेश चव्हाणवर संशय आल्याने त्यांनी गणेशची इतर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असता त्याची एक मैत्रीण सापडली. तिच्याक़डे चौकशी केली असता असं निष्पन्न झाले की, गणेश चव्हाणकडे तिसरा फोन होता. अपघाताची घटना घडून गेल्यानंतरही तिसऱ्या नंबरवरून या तरुणीशी संवाद साधला जात होता. मेसेज, चॅट सुरू होते. त्यामुळे पोलिसांचा गणेशचा तपास सुरू केला.
बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले ...
गणेशचा तपास करण्यासाठी लातूर पोलिसांनी त्याचा तिसरा फोन नंबर ट्रेस करण्यास सुरुवात केली. जो आधी कोल्हापूर, नंतर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गपर्यंतचे लोकेशन दाखवत होता. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी गणेश चव्हाणला जिवंत पकडले. त्यामुळे कारमध्ये असलेला मृत व्यक्तीचा सांगाडा हा दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले. गणेशची चौकशी केल्यावर समोर आले की, गणेशवर फ्लॅटचे कर्ज होते. ते कर्ज कमी करण्यासाठी गणेश चव्हाण याने १ कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स काढण्याचा प्लॅन केला. या टर्म इन्शुरन्ससाठी त्याने मृत्यूचा कट रचला.
यासाठी त्याने तुळजापूर टी पॉईंट औसा इथून एका व्यक्तीला लिफ्ट दिली होती. गोविंद यादव असे या व्यक्तीचे नाव होते. गोविंद यादवला गणेशने कारच्या समोरील सिटीवर बसवले आणि कारला आग लागली तरी तो तिथून पळून जाणार नाही, असे नियोजन करून गोविंद यादव यांचा त्याने खून केला. एवढेच नाहीतर मृतदेह हा आपलाच आहे, असे भासावे म्हणून गणेशने आपल्या हातातले कडे गोविंद यादवच्या सीटवर ठेवले. जेणे करून पोलिसांना संशय येणार नाही. त्याच्या कुटुंबीयांनाही हे सत्य असल्याचे वाटले. पण, औसा पोलिसांच्या तपासात सत्य समोर आले आहे. औसा पोलीस स्टेशनमध्ये गोविंद यादव याचा खून केला या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी गणेशला अटक केली आहे.





