लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा
मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन बिघडते. अनेक प्रवासी कामाच्या ठिकाणी विलंबाने पोहोचल्याने त्यांच्या वेतनातून पगार कपात होण्याच्या घटना घडतात. तसेच अनेक रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना लोकलच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे त्रासास तोंड द्यावे लागते. रेल्वेच्या अशा कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ई-मेल करण्यास सुरुवात केली आहे.
मध्य रेल्वेवरील लोकल रोजच उशिरा धावतात. त्यामुळे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. दररोज विलंबाने लोकल धावत असल्याने लोकलमधील गर्दी वाढते, पुढील प्रवासाच्या वेळा चुकतात. लोकल रखडल्याने किंवा उशीरा धावल्याने काही प्रवाशांच्या बाहेरगावच्या गाड्या, विमाने चुकल्याच्याही घटना घडल्या आहेत. प्रवासी वेळेत फलाटावर पोहोचून देखील विलंबाने धावत असलेल्या लोकलने प्रवास करावा लागतो. तसेच प्रवाशांना विलंबाबद्दल, लोकल रद्द झाल्याबाबत, लोकल बिघाडाबाबत अनेकदा माहितीही दिली जात नसल्याने प्रवाशांची परवड होते.
मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लोकलच्या ढासळणाऱया वक्तशीरपणाकडे लक्ष द्यावे. विलंबाच्या वेळी वेळेवर आणि स्पष्ट घोषणा कराव्यात. बिघाडाच्या घटना कमी होण्यासाठी सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना ई-मेलद्वारे प्रवासी करत आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकासह इतर अधिकाऱ्यांच्या ई-मेलवर प्रवासी तक्रारींचे मेल करत आहेत.
मध्य रेल्वेचे कोलमडलेले वेळापत्रक
एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या आठ महिन्याच्या कालावधीत नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेचा वक्तशीरपणा ढासळला. दर महिना सरासरी वक्तशीरपणा ९२ ते ९३ दरम्यान होता. परंतु, नोव्हेंबरमध्ये ९१.६८ टक्क्यांपर्यंत खाली आला. तसेच गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये ९३.३८ टक्के सरासरी वक्तशीरपणा होता. त्यातुलनेत यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये १.७ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या बेशिस्त कारभाराबाबत संताप व्यक्त करत आहेत.






