Tuesday, December 16, 2025

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

पहलगाम अतिरेकी हल्ला, एनआयएने ५८ मार्ग आणि शेकडो किमी. जंगलात तपास करुन दाखल केले आरोपपत्र

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सात जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. याआधी तपास यंत्रणेने सलग २३७ दिवस तपास केला. तपासादरम्यान ५८ मार्गांचा आढावा घेतला. जंगलात शेकडो किमी. प्रवास करुन अतिरेकी नेमके कसे आले हे समजून घेतले. यानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले.

आरोपपत्रात पाकिस्तानमधून नियंत्रित केल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तोयबा (एलईटी) आणि तोयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या दोन अतिरेकी संघटनांना आरोपी करण्यात आले आहे. जम्मूमधील एनआयएच्या विशेष न्यायालयात पहलगाम प्रकरणी १५९७ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झालेल्या फैसल जट्ट उर्फ ​​सुलेमान शाह, हबीब ताहिर उर्फ ​​जिब्रान आणि हमजा अफगाणी या तीन अतिरेक्यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. श्रीनगरच्या दाचीगाम भागात ऑपरेशन महादेव राबवून सुरक्षा दलांनी या अतिरेक्यांना ठार केले होते. आरोपपत्रात बशीर अहमद जोथर आणि परवेझ अहमद जोथर या दोघांचीही नावे आहेत. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल एनआयएने २२ जून २०२५ रोजी या दोघांना अटक केली होती. पहलगाम हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख त्यांनी उघड केली होती. त्यांनी हे देखील सांगितले होते की, ऑपरेशन महादेव दरम्यान ठार झालेले तिन्ही अतिरेकी पाकिस्तानचे नागरिक आहेत. या व्यतिरिक्त भारतातील अन्य एकाचाही हल्लेखोरांचा स्थानिक मदतनीस म्हणून आरोपपत्रात उल्लेख आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने भारतीय न्याय संहिता २०२३ (बीएनएस),शस्त्रास्त्र कायदा १९५९ आणि बेकायदा कारवायांना प्रतिबंध घालणारा कायदा १९६७ (UAPA) तसेच भारताविरुद्ध युद्ध पुकारण्याचाही गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) घटनास्थळावरून जप्त केलेल्या काडतुसे आणि इतर फॉरेन्सिक पुराव्यांची सखोल तपासणी केली. डीएनए चाचणीसाठी अनेक नागरिकांच्या रक्त आणि केसांचे नमुने घेतले. वेगवेगळ्या भागांचे डिजिटल मॅपिंग केले. गुन्हा घडला नेमका तेव्हाचा आणि त्याआधीच घटनाक्रम समजून घेतला. मोबाईलचे कॉल रेकॉर्ड अर्थात डंप डेटा आणि सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले. पीडितांशी बातचीत केली. पीडितांकडून अतिरेक्यांविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवली. अतिरेक्यांची चेहरेपट्टी तसेच त्यांच्या संवाद साधण्याच्या भाषेबाबत माहिती घेतली. छायाचित्रकार, स्थानिक तसेच घोड्यांचे आणि खेचरांचे मालक, झिप लाईन ऑपरेटर आणि हॉटेल व्यावसायिकांसह सुमारे एक हजार नागरिकांची चौकशी केली. अतिरेकी सॅटेलाईट फोन वापरत होते ही माहिती मिळाल्यावर तपास यंत्रणेने अतिशय काळजीपूर्वक पुढील तपास केला.

एका सॅटेलाइट फोनमध्ये सापडलेल्या मायक्रो-एसडी कार्डमधून तपास यंत्रणेने अतिरेक्यांची बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट्स, चेहऱ्याचे टेम्पलेट्स आणि कौटुंबिक पार्श्वभूमी) मिळवली. अतिरेक्यांची पाकिस्तानमधील घरं तपास यंत्रणेने डेटाबेसच्या मदतीने शोधली.

कराचीतल्या कंपनीत तयार होणाऱ्या "कँडीलँड" आणि "चोकोमॅक्स" चॉकलेटचे रॅपर्स, अतिरेक्यांच्या बॅगेतली पाकिस्तानमधली मासिके हे पुरावे तपास यंत्रणेने जप्त केले. तपासात असे दिसून आले की अतिरेक्यांनी मे २०२२ मध्ये गुरेझ सेक्टरमधून नियंत्रण रेषा ओलांडली होती. आयबी इंटरसेप्ट्सवरून २१ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी सीमेवरून पहिला रेडिओ चेक-इन उघड झाला. बशीर आणि परवेझने कबुली दिली की त्यांनी २१ एप्रिलपर्यंत अतिरेक्यांना मार्गदर्शन केले. यानंतर २२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी अतिरेकी बैसरन खोऱ्याच्या मैदानात चालत गेले. एनआयएच्या मते, सुलेमान शाहच्या जीपीएस उपकरणाने शोधलेले पॉइंट्स नेमके तेच ठिकाण होते जिथून गोळीबार झाला. अतिरेक्यांनी २२ एप्रिल २०२५ च्या दुपारी गोळीबार केला आणि दाचीगामच्या दिशेने पळाले.

घटनास्थळावरुन जप्त केलेल्या गोळ्यांचे खोके अतिरेक्यांच्या हातातील वापरलेल्या एके १०३ रायफलमधील गोळ्यांशी जुळले. तपास यंत्रणेने सुरुवातीला प्रसिद्ध केलेली रेखाचित्रे ही २०२४ मधील एका हल्ल्याशी संबंधित असल्याचे नंतर सांगण्यात आले. यानंतर नव्याने तपास केल्यावर असे लक्षात आले की, हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी साजिद सैफुल्ला जट्ट होता, जो लष्कर-ए-तोयबाचा दक्षिण काश्मीरचा प्रमुख होता. तो लाहोरमधील चांगा मंगा येथील रहिवासी आहे. तो सतत अतिरेक्यांच्या संपर्कात होता. तपास यंत्रणेने ठोस माहितीआधारे आरोपपत्रात नमूद केले की, २९ जुलै रोजी लष्कर-ए-तोयबाचा रावलकोट प्रमुख रिझवान अनीस याने मारल्या गेलेल्या अतिरेक्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि गैबाना नमाज केला अर्थात विशिष्ट वेशात प्रार्थना केली.

दाचिगाम जंगलात अतिरेक्यांना मदत पुरवणारा मोहम्मद युसुफ कटारी याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश केला. आता राष्ट्रीय तपास यंत्रणा लष्कर-ए-तोयबाचा कट आणि हाफिज सईदची भूमिका उघड करण्यासाठी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचीही शक्यता आहे.

Comments
Add Comment