Tuesday, December 16, 2025

मीरा रोडच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधील अमली पदार्थांचा कारखाना केला उद्ध्वस्त

मीरा रोडच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधील अमली पदार्थांचा कारखाना केला उद्ध्वस्त

१०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

भाईंदर : मीरा रोडच्या काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा तपास करत असताना राजस्थान राज्यातील झुनझुनू गावातील अमली पदार्थ बनविणारा कारखाना उघडकीस आला असून पोलिसांनी १०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.

मीरा रोड येथील काशिगाव पोलीस ठाण्याचे पथक ४ ऑक्टोबर रोजी गस्त घालत असताना ६ इसमांची संशयावरून झडती घेतली. त्यांच्याकडे १ लाख ३२ हजार रुपयांचे अमली पदार्थ आढळले. त्यांना अटक करून तपास करत असताना आणखीन ४ आरोपी असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी पोलीस पथक राजस्थान राज्यातील झुनझुनू गावात पोहोचले. तेथे त्यांना अमली पदार्थ बनविण्याचा कारखाना उघडकीस आला.

पोलिसांनी सुमारे १० किलो एमडी, एमडीचे प्री-कर्सर रसायने तसेच एमडी बनविण्याची आवश्यक ती साधनसामग्री (फ्लास्क, मिक्सर, ड्रायर मशिन, वजन काटा, हँड ग्लोज, फिल्टर इ) असा १०० कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कारखाना चालविणारा अनिल विजयपाल सिहागला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक समीर शेख आणि त्यांच्या पथकाने केली.

Comments
Add Comment