Tuesday, December 16, 2025

IPL AUCTION 2026... फक्त ११ सामन्यांतून थेट १४ कोटी; चेन्नईने कुणावर लावली मोठी बाजी?

IPL AUCTION 2026...  फक्त ११ सामन्यांतून थेट १४ कोटी; चेन्नईने कुणावर लावली मोठी बाजी?

मुंबई : आयपीएलचा मिनी लिलाव दुबईत झाला. यंदा या लिलावात ३६९ खेळाडू सहभागी झाले होते. या लिलावात सर्वाधिक चर्चा झाली ती ऑस्ट्रेलियाच्या कॅमरुन ग्रीनच्या बोलीची. कोलकाता नाईट रायडर्सने कॅमरुन ग्रीनला तब्बल २५.२० कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. कॅमरुन ग्रीनसाठी चेन्नई सुपर किंग्जनेही शेवटपर्यंत जोरदार प्रयत्न केले, मात्र अखेर त्यांना माघार घ्यावी लागली.

कॅमरुन ग्रीन हातातून निसटल्यावर चेन्नई सुपर किंग्जने नवख्या खेळाडूवर मोठी बाजी लावली. उत्तर प्रदेशच्या अष्टपैलू खेळाडू प्रशांत वीरला चेन्नईने १४.२० कोटी रुपयांना खरेदी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

प्रशांत वीर हा उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी असून तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. त्याचबरोबर तो आक्रमक फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. प्रशांत वीरने आतापर्यंत दोन प्रथम श्रेणी सामने आणि नऊ टी-२० सामने खेळले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १२ विकेट्स घेतल्या असून ११२ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट १७० च्या आसपास आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत उत्तर प्रदेशकडून खेळताना प्रशांत वीरने दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत त्याने ३७ पेक्षा जास्त सरासरीने धावा करत १७० च्या जवळपास स्ट्राईक रेट राखला. गोलंदाजीतही त्याने प्रति षटक अवघ्या ६.७ धावांच्या इकॉनॉमीने नऊ विकेट्स घेतल्या.

यूपीटी २० स्पर्धेतही प्रशांत वीरने आपली छाप पाडली. दहा सामन्यांत त्याने ३२० धावा करत आठ विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट १५५.३४ इतका होता. उत्तम क्षेत्ररक्षण हेही त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

चेन्नई सुपर किंग्जने प्रशांत वीरला रवींद्र जडेजाच्या जागी एक प्रभावी पर्याय म्हणून संघात घेतले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर मधल्या षटकांत तो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. आता कोटींची बोली लागलेला हा नवखा खेळाडू आयपीएलमध्ये चेन्नईसाठी कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment