मुंबई : मुंबईतील शाळा, रुग्णालये, मॉल्स, औद्योगिक व वाणिज्यिक संकुले, दाटीवाटीच्या वस्ती तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांना अग्नि प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देणे व अग्निसुरक्षा विषयक जनजागृती वाढवण्यावर महापालिका आणि अग्निशमन खात्याने भर दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलामार्फत ‘अग्निसुरक्षा जनजागृती वाहन’ (Fire Safety Education Van) विकसित करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी अग्निसुरक्षा जनजागृती वाहनाची मंगळवारी १६ डिसेंबर २०२५ रोजी पाहणी केली. आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, आग लागण्यापूर्वी घ्यावयाची आवश्यक खबरदारी, आग लागल्यानंतर योग्य व शास्त्रीय प्रतिसाद, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळविण्याची प्रक्रिया नागरिकांना सोप्या व समजण्यासारख्या पद्धतीने या उपक्रमाद्वारे समजावून सांगण्यात येणार आहे. यासोबतच अग्निशमन यंत्रांचा योग्य वापर, आपत्कालीन स्थलांतर पद्धती, तसेच अग्निसुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन करण्यात येईल. एकूणच, या वाहनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेविषयक जागरूकता निर्माण करणे, सुरक्षिततेची संस्कृती रुजविणे आणि संभाव्य आपत्तींचा धोका कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यावेळी म्हणाल्या की, नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन अग्निसुरक्षेविषयक जनजागृती करणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे व इतरांचे प्राण वाचविण्यास उपयुक्त ठरणारे प्राथमिक बचाव प्रशिक्षण देणे, ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आहे. या अग्निसुरक्षा जनजागृती वाहनाच्या माध्यमातून विविध परिसरांमध्ये पोहोचून मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत अग्निसुरक्षेचा महत्त्वपूर्ण संदेश प्रभावीपणे पोहोचविला जाणार आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या व वेगाने वाढणाऱ्या महानगरात आग लागण्याच्या घटना अल्पावधीतच गंभीर स्वरूप धारण करू शकतात. अशा परिस्थितीत नागरिकांकडे आवश्यक माहिती, सजगता व प्राथमिक प्रतिसादाची क्षमता असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
या पार्श्वभूमीवर, आग लागण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना, आग लागल्यास तत्काळ घ्यावी लागणारी दक्षता, तसेच आपत्कालीन सेवांशी प्रभावी समन्वय साधण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अग्निसुरक्षा जनजागृती मोहिमा नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णायक ठरतात. या उपक्रमामुळे संभाव्य अपघातांचे प्रमाण कमी करण्यास तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी व्यक्त केला.
प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर म्हणाले की, मुंबई महानगरातील विविध शाळा, रुग्णालये, व्यापारी संकुले व मॉल्स, औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना, दाटीवाटीच्या वसाहती तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन हे अग्निसुरक्षा जनजागृती वाहन नागरिकांना अग्नि प्रतिबंधक उपाययोजनांची सखोल व प्रत्यक्ष माहिती देणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत अग्निसुरक्षेविषयक मूलभूत मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
अग्निसुरक्षा जनजागृती वाहनाची वैशिष्ट्ये
- फायर एक्सटिंग्विशरचे प्रात्यक्षिक : नागरिकांना फायर एक्स्टिंग्विशरचे प्रकार, त्यांचा योग्य वापर, आग विझवताना घ्यावयाची काळजी याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले जाईल.
- अग्नी सुरक्षा यंत्रणांची माहिती देणे : इमारतींमध्ये असणारी फायर अलार्म प्रणाली, स्प्रिंकलर, हायड्रंट लाइन, आपत्कालीन मार्ग, आश्रय क्षेत्र (Refuge Area) अशा यंत्रणांची रचना व उपयोग याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले जाईल.
- आग लागल्यावर घ्यावयाची खबरदारी : आग आटोक्यात आणण्यापूर्वी स्वतःचा बचाव व इतरांची सुरक्षितता कशी सुनिश्चित करावी, धूर पसरल्यास काय करावे, वीज पुरवठा बंद करण्यासारख्या तातडीच्या उपायांची माहिती देण्यात येईल.
- अग्निशमन दलाशी संपर्क प्रक्रिया : आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलास कशी आणि कोणती माहिती देऊन संपर्क साधावा, दुर्घटना स्थळाची अचूक माहिती देण्याचे महत्त्व, प्राथमिक स्थितीचे निरीक्षण इत्यादी बाबी सोप्या भाषेत समजावले जाणार आहेत.






