मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून भाजप-शिवसेना-रिपाइंने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत भाजपचे मंत्री आशिष शेलार आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा केली. २२७ पैकी १५० हून अधिक जागा जिंकून मराठी महापौर बसवणे, हाच महायुतीचा फॉर्म्युला असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची संयुक्त बैठक भाजपच्या दादर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, अतुल भातखळकर, प्रविण दरेकर उपस्थित होते, तर शिवसेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविका शितल म्हात्रे उपस्थित होते. त्याआधी भाजप आणि रिपाइंची बैठक झाली. दोन्ही बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले, "देशाचा शत्रू दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या व्यक्तीसोबत मांडीला मांडी लावून बसण्याची भाजपची इच्छा नाही. राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते जर नवाब मलिक असतील तर त्यांच्यासोबत युती होणार नाही", असे बैठकीत ठरल्याचे शेलार यांनी नमूद केले.
तर, अमित साटम यांनी सांगितले की, महापालिकेतील २२७ जागांवर महायुती म्हणून निवडणूक लढवली जाईल. जागा वाटपाबाबत कोणताही दावा करण्यात आलेला नाही. महायुतीचा महापौर मुंबईत विराजमान होण्यासाठी आणि १५० हून अधिक जागा जिंकण्यासाठी चर्चा झाली आहे. राष्ट्रवादीसोबत युती न करण्याचे कारण म्हणजे नवाब मलिक यांच्यावरील आरोप असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.
जागा वाटपात कोणतेही मतभेद नाहीत - राहुल शेवाळे
शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनीही बैठकीनंतर माध्यमांना सांगितले की, महायुतीचा विजय कसा होईल यावर चर्चा झाली. २२७ पैकी १५० पेक्षा अधिक जागा जिंकून महायुतीचाच महापौर बसवणे हा फॉर्म्युला आहे. जागा वाटपात कोणतेही मतभेद नाहीत आणि चांगला समन्वय आहे. कोणत्याही परिस्थितीत महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
मुंबईचा महापौर मराठीच असेल - आशिष शेलार
आशिष शेलार यांनी पुढे म्हटले की, मुंबई मराठी माणसांचीच आहे आणि महापौर हा मराठीच असेल. भाजप, शिवसेना आणि रिपाई यांची युती महायुती म्हणून निवडणूक लढेल. जागा वाटप अंतिम करण्यासाठी दोन दिवसांत पुन्हा बैठक होणार आहे. महायुतीने १५० प्लस जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, मुंबईकरांचा विश्वास संपादन करून जिंकण्याचा आमचा निर्धार आहे.






