वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांच्या मठाला भेट दिली. या भेटीदरम्यानचे क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विराट आणि अनुष्का हे दोघेही प्रेमानंद महाराजांचे भक्त आहेत. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघेही महाराजांसमोर जमिनीवर बसून हात जोडून संवाद साधताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान महाराजांनी ईश्वराशी जोडलेले राहण्याचा संदेश दिला. त्यांचे विचार ऐकताना अनुष्का शर्मा भावुक झाल्याचे दिसून आले असून, तिच्या डोळ्यात अश्रू तरळताना स्पष्ट दिसत आहेत.
या वेळी दोघांचाही साधेपणा विशेष लक्ष वेधून घेत होता. अनुष्काने साधा ड्रेस, शॉल आणि गळ्यात तुळशीची माळ परिधान केली होती. तर विराट कोहलीही तुळशीची माळ घालून महाराजांसमोर नम्रपणे बसलेला दिसत होता. महाराजांच्या उपदेशानंतर अनुष्काने “तुम्ही आमचे आहात महाराज” असे म्हटले असता, महाराजांनी “आपण सर्व ईश्वराचे आहोत” असे उत्तर दिले.
काही दिवसांपूर्वी अनुष्का भारतात आल्याने ती खासगी कारणांसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी आले असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्यात विराट आणि अनुष्का प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या भेटीमुळे विराट–अनुष्काच्या अध्यात्मिक जीवनाची पुन्हा एकदा चर्चा रंगली असून, त्यांचा हा व्हिडीओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.





