इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा यंत्रणेने १४ दहशतवाद्यांना अटक केली. मणिपूरमधील सहा जिल्ह्यांमधील डोंगराळ भागात सुरक्षा यंत्रणेने एकाचवेळी कारवाई केली. अटक केलेल्या दहशतवादी भारत विरोधी कारवायांमध्ये सहभागी होते, अशी माहिती सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.
सुरक्षा यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून २१ शस्त्रे, स्फोटक साहित्य, बंदी असलेल्या वस्तू आणि युद्धासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने ठिकठिकाणी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवायांना ताज्या जप्ती आणि अटकसत्रामुळे मोठे यश मिळाले आहे.
गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे ही कामगिरी करण्यात आली. अचूक नियोजन केल्यामुळे कमी कालावधीत सुरक्षा यंत्रणेने प्रभावी कामगिरी केली. मणिपूरमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील, असे सुरक्षादलांनी सांगितले आहे.
दरम्यान, मणिपुरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्करी कारवाईसोबतच राजकीय पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. मे २०२३ नंतर प्रथमच कुकी आणि मैतेई समुदायातील भाजप आमदारांनी दिल्लीत बैठक घेतली. फेब्रुवारीपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून या घडामोडींमुळे सरकार स्थापनेबाबत चर्चांना वेग आला आहे.






