शिवसेनेला विधानसभेत खाते खोलण्याची संधी
मुंबई (सचिन धानजी): मागील पाच ते सहा निवडणुकांमध्ये चेंबूरमधील एकाच प्रभागातून सातत्याने चंद्रकांत हंडोरे आणि त्यांची पत्नी निवडून येत आहे. परंतु यंदा प्रथमच हंडोरे यांना आपल्या घरात नगरसेवक टिकवून ठेवण्यासाठी हा प्रभाग शिल्लक राहिलाच नाही. हंडोरे कुटुंबाकडे मागील अनेक वर्षांपासून असणारा प्रभाग क्रमांक १५० हा ओबीसी महिला आरक्षित झाल्याने हंडोरे कुटुंबाला अन्य प्रभागाचा शोध घेण्याची वेळ आली आहे, तसेच आपला गड राखण्यासाठी कुटुंबातील अन्य सदस्यांचा किंवा मर्जीतील पदाधिकाऱ्यांला निवडणूक रिंगणात उतरवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे या चेंबूर विधानसभेतून मनसेच्या वाट्याला एखादी जागा लागू शकते, तर शिवसेनेचा आमदार असले तरी त्यांच्याकडे पाच पैंकी दोन जागा जाण्याची शक्यता आहे.
चेंबूर विधानसभेत मागील दोन विधानसभांमध्ये शिवसेनेचे प्रकाश फातर्पेकर हे निवडून येत असले तरी दोन शिवसेना स्वतंत्र झाल्यानंतर या प्रभागातून उबाठाचे तुकाराम काते हे निवडून आले आहेत. त्यामुळे चेंबूरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला असला तरी भाजपाच्यावतीने तीन जागा लढवल्या जाण्याची शक्यता आहे. चेंबूर विधानसभेत काँग्रेसचा एक, भाजपा दोन आणि उबाठाचे दोन अशाप्रकारे पाच नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु प्रभाग क्रमांक १५०ची जागा भाजपा आपल्याकडे घेवून रिपाइंला देण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी प्रभाग क्रमांक १५३ आणि प्रभाग क्रमांक १५५ हे दोनच प्रभागांचे पर्याय असून एकही नगरसेवक या विधानसभेत नसल्याने या प्रभागात विजय मिळवून शिवसेनेला आपले खाते उघडण्याची संधी प्राप्त झाली आहे.
लोकसभेत चेंबूर विधानसभेतून झालेले मतदान
अनिल देसाई उबाठा : ६१,३५५
राहुल शेवाळे, शिवसेना : ५८,४७७
चेंबूर विधानसभेतील मतदान
तुकाराम काते, शिवसेना : ६३,१९४
प्रकाश फातर्पेकर, उबाठा : ५२,४८३
आनंद जाधव, वंचित : ८,८५४
माऊली थोरवे, मनसे : ७,८२०
दिपकभाऊ निकाळजे, रिपाइं: ७,४४०
प्रभाग क्रमांक १५० (ओबीसी महिला)
हा प्रभाग यापूर्वी खुला झाल्याने या मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर माजी महापौर आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी संगीता हंडोरे या निवडून आल्या होत्या. परंतु, यंदा या प्रभागात ओबीसी महिला आरक्षण पडल्याने याठिकाणी प्रथमच काँग्रेसच्यावतीने हंडोरे यांच्या घरातील कोणीही उमेदवान नसेल असे बोलले जात आहे. चेंबूरमधील काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे हा चेहरा असल्यामुळे आरक्षणाच फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने हंडोरे यांच्या पत्नी संगीता या आता प्रभाग क्रमांक १५५मध्ये जिथे एससी महिला आरक्षित झाला आहे, तिथे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हंडोरे आपल्या पत्नीला प्रभाग १५५मधून उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजे प्रभाग १५०मध्ये कोणाला उतरवतात हा प्रश्न जनतेला पडला आहे. या प्रभागात हंडोरे यांची ताकद पाहता यंदा मात्र आरक्षणामुळे त्यांच्या कुटुंबातील अगदी जवळची व्यक्ती कुणी निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रभागात काँग्रेसचे प्राबल्य असून हा प्रभाग शिवसेनेला सोडला जावू शकतो. परंतु याठिकाणी शिवसेना किंवा भाजपा तसेच उबाठाकडेही तुल्यबळ उमेदवार नाही. त्यामुळे भाजपाकडे ही जागा जाईल आणि ही जागा रिपाइं आठवले गटासाठी सोडली जावू शकते असेही बोलले जात आहे.
प्रभाग क्रमांक १५२ (अनुसूचित जाती )
हा प्रभाग पुन्हा एक अनुसचित जातीकरता आरक्षित झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून आलेल्या भाजपाच्या आशा मराठे यांचा वॉर्ड शाबूत राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपाच्यावतीने आशा मराठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे या प्रभागातून उबाठाकडून पुन्हा उमेदवाराचा शोध सुरु झाला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५५मधील माजी नगरसेवक श्रीकांत शेट्ये यांना या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी विनंती केली जात आहे. त्यामुळे या प्रभागात उबाठाच्यावतीने श्रीकांत शेट्ये यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. मात्र, त्यांनी ही उमेदवारी नाकारल्यास पुन्हा एकदा डॉ सोनाली साळवे यांना निवडणूक रिंगणात उतरवावे लागणार आहे. त्यामुळे उबाठा विरुध्द भाजपा अशीच लढत याठिकाणी होणार आहे. सुमारे १४०० मतांनी आशा मराठे यांचा सन २०१७मध्ये निवडून आल्या होत्या. पण आता हा मतदार संघ भाजपाने एवढा बांधला की उबाठाला आता मागील वेळेपेक्षा अधिक मतदानही घेता येणार नाही अशी स्थिती आहे.
प्रभाग क्रमांक १५२ (ओबीसी महिला)
हा प्रभाग पूर्वी ओबीसी होता, परंतु आबीसी महिला राखीव झाल्याने या प्रभागातून निवडून आलेल्या उबाठाचे नगरसेवक अनिल पाटणकर यांना घरी बसण्याची वेळ आली आहे. हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाल्याने अनिल पाटणकर यांनी उबाठाच्यावतीने आपली पत्नी मिनाक्षी पाटणकर यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केला आहे. तर हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून चेंबूरचे आमदार तुकाराम काते हे आपल्या मोठ्या सुनेला या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. काते यांचे ज्येष्ठ पुत्र तुषार यांची पत्नी तन्वी काते ही या प्रभागातून इच्छुक आहेत. त्यामुळे या प्रभागात काते विरुध्द पाटणकर अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, काँग्रेसकडून कुणाही ठोस उमेदवाराचे नाव पुढे आलेले नाही. अनिल पाटणकर हे पूर्वी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते, पण त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेकडून पोटनिवडणूक लढवून ते विजयी झाले होते.त्यानंतर शिवसेनेकडून ते विजयी झाले होते. पण शिवसेना फुटल्यानंतर ते उबाठा शिवसेनेतच राहिले. अनिल पाटणकर हे तब्बल ७८६७ मतांनी विजयी झाले होते.त्यामुळे या प्रभागात पाटणकर यांनी मजबूत पाय रोवलेले असल्याने शिवसेनेला हा उबाठाचा गड फोडण्यासाठी मोठी शर्थीची लढाई द्यावी लागणार आहे.
प्रभाग क्रमांक १५४(सर्वसाधारण)
हा प्रभाग पुन्हा एकदा खुलाच राहिल्याने भाजपचे विद्यमान नगरसेवक महादेव शिवगण यांच्यासमोरे उमेदवारीचे मोठे आहे. प्रभाग पुन्हा खुला झाल्याने महादेव शिवगण हे प्रबळ दावेदार असले तरी या प्रभागातून टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे राहुल वाळुंज, भूपेन लालवानी यांचीही इच्छुक म्हणून नावे पुढे सारली जात आहेत. त्यामुळे भाजपा कुणाला उमेदवारी देणार हे स्पष्ट नाही. तर उबाठातही उमेदवारीबाबत स्पर्धा आहे. मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर गेलेले उबाठाचे शेखर चव्हाण हे पुन्हा इच्छुक आहेत. तर त्यांच्यासोबत निलेश गवळीही इच्छुक आहे. तर काँग्रेसकडूनही उमेदवाराचे नाव निश्चित किंवा चर्चेतून ऐकायला मिळत नाही. तर काँग्रेसच्यावतीने राजेंद्र माहुलकर यांचेही नाव चर्चेत आहे.शिवगण यांनी सन २०१७मध्ये तब्बल २४१० मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे राजेंद्र माहुलकर निवडणूक लढवल्यास याठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक १५५( अनुसूचित जाती महिला)
हा प्रभाग यापूर्वी अनुसूचित जाती करता राखीव होता, परंतु यावेळी तो अनुसूचित जाती महिला याकरता राखीव झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून विजयी झालेले उबाठाचे श्रीकांत शेट्ये यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे. या प्रभाग अनुसूचित जाती महिलाकरता राखीव झाल्याने श्रीकांत शेट्ये हे पत्नी वर्षा शेट्ये यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या विचारात आहेत. मात्र हा प्रभाग एस सी महिलाकरता राखीव झाल्याने हंडोरे यांच्या पत्नी संगीता हंडोरे याठिकाणाहून इच्छुक असल्याचे ऐकायला मिळत आहे. या प्रभागातून श्रीकांत शेट्ये २८१४ मतांनी विजयी झाले होते आणि दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे नगराळे होते. त्यांनी ५१९९ मते मिळवली होती. काँग्रेससाठी हा मतदार संघ पुरक असल्याने संगीता हंडोरे यांच्या नावाची या प्रभागातून चर्चा ऐकायला मिळत आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपाकडून या प्रभागातील इच्छुक नाव पुढे आलेले नसून नक्की या प्रभागावर कोण दावा करतो याचीच उत्सुकता जनतेला आहे.






