मुंबई शहराच्या वाढत्या जडणघडणावेळी इतर वास्तूंप्रमाणेच एक प्रत्यक्ष साक्षीदार असलेले कुलाब्यातील ससून डॉक आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत चर्चेचा विषय ठरले आहे. आज येथील कोळी बांधव व व्यापारी आज हे बंदर वाचवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरले असून आता मुंबईकरांनी हा अनमोल ठेवा वाचवण्यासाठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
ससून डॉक मत्स्य खवय्ये प्रेमींसाठी एक मुंबईतील मोठी बाजारपेठ असून दररोज करोडो रुपयांची उलाढाल या बंदरातील मासेमारीमुळे होते. ससून डॉक हे मुंबईतील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असून, १८७५ मध्ये बांधलेले हे पश्चिम भारतातील पहिले व्यावसायिक ओले डॉक होते, जे बगदादी ज्यू कुटुंबातील डेव्हिड ससून अॅण्ड कंपनीने बांधले. कुलाबा येथे असलेले हे डॉक, मुंबईच्या कोळी समाजासाठी ‘म्हावरे बाजार’ म्हणून ओळखले जाते आणि आजही मुंबईतील मासेमारी उद्योगाचे केंद्र आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात मासे येतात आणि मुंबईची माशांची गरज भागते. आज इतर बंदरातील म्हणजे भाऊचा धक्का, वर्सोवा, मढ, अलिबाग, उत्तन येथील चांगल्या दर्जाची कोलंबी येथे आणली जाते. येथे ती कोलंबी सोलून ती निर्यात करण्यासाठी ससून डॉक येथील गोदामात ठेवली जाते. या गोदामातून परदेशात मोठ्या प्रमाणात कोलंबी निर्यात केली जाते. त्यात अमेरिका युरोपीय देश, चीन, जपान या देशांचा समावेश होतो. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होतेच त्याचप्रमाणे देशी व आंतरदेशीय व्यापारामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळून देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळत आहे. सध्या या ससून डॉकचा विषय चर्चेत येण्याचे कारण तेथील अर्ध्याधिक गोदामांना आज टाळे लागले आहे. ही गोदामे व त्यांच्या जागा म्हणजेच हे ससून डॉक आज ज्या धरतीवर वसले आहे ती त्याचे मूळ मालक हे मुंबई पोर्ट ट्रस्ट हे आहे. विशेष म्हणजे मुंबईत जेवढी मच्छीमारांची बंदरे आहेत तिथे कोणतेही गोदाम नाही. मात्र ससून डॉक एक मात्र असे आहे की, जिथे गोदामे बसवलेली आहेत. याचे मूळ मालक मुंबई पोर्ट ट्रस्टने ही जागा महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांना दिली होती. त्यांनी ती मच्छीमार व्यवसायिकांना व्यापार करण्यासाठी भाडेतत्त्वावर दिली. येथील मच्छीमार व्यावसायिक हे नियमित महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे याचे भाडे भरत असतात. मात्र या महाराष्ट्र पिशवीत डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ही भाडे मुंबई पोर्ट ट्रस्टला दिली नाही, तर स्वतःकडेच ठेवून दिली. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टने ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला. यातील कोर्टकचेऱ्या झाल्यानंतर ही जागा सर्वोच्च न्यायालयाने रिकामी करण्याचे आदेश दिले. मात्र १४ वर्षांपासून जागेचा हा मूळ मुद्दा कायम असून कोणाकडेच याचे उत्तर नाही. त्यामुळे आता येथील गोदामांना टाळे मारण्यात आले,असून तेथील हजारो मच्छीमार व व्यावसायिक देशोधडीला लागला आहे.
सर्वोच्च न्यायालयात पोट भाडेकरू हा प्रकारच अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आणून दिल्याने आज या मच्छीमार संघटनांवर ही विस्थापित होण्याची पाळी आली. आज येथील गोदामं ६० ते ७० टक्के बंद आहेत सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना त्रिपक्षी करार करण्याचे आदेश दिले होते, मात्र २०१४ ते २०२५ दरम्यान कोणताही त्रिपक्ष करार करण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने वा महाराष्ट्र डेव्हलपमेंट कार्पोरेशनने प्रयत्न केले नाहीत त्यामुळे हा जाणून-बुजून तू मार मी रडण्याचा प्रयत्न करतो असा प्रयत्न सुरू असल्याचा मच्छिमार संघटनांचा आरोप आहे. येथील मच्छीमार व्यवसायावर साधारण एक लाख लोकांचा रोजगार अवलंबून आहे याच कुलाबा परिसरात बॅकबे मच्छीमार नगर यासारखे मच्छीमार वसाहती तसेच मोठमोठ्या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत त्यातील बहुतांश कामगार हा या ससून डॉकवर उदरनिर्वासाठी ससून डॉकवर अवलंबून आहे. उद्या जर ससून डॉक बंद पडले तर त्यातील ८० टक्के कामगार देशोधडीला लागेल. इतकेच नव्हे तर आता नवीन कायद्याप्रमाणे १९६२ सालची झोपडपट्टी अधिकृत करण्याचे शासकीय स्तरावर आदेश निघाले आहेत. ही झोपडपट्टी तर नंतर वसलेली आहे. म्हणजे संपूर्ण झोपडपट्टीचा परिसरच आता खाजगी विकासकांच्या दावणीला बांधला जात आहे की काय अशी शंका मच्छीमार संघटनांना येऊ लागली आहे. त्यामुळे त्यांनी याचा जोरदार विरोध करून ससून डॉक कशाप्रकारे वाचवता येईल यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या मंगळवारी ससून डॉक आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सर्व मच्छीमार तसेच व्यापारी संघटना सहभागी होणार आहेत. या व्यवसायात ससून डॉकमध्ये भारतातील ओरिसा कर्नाटक बिहार यूपीमधील हजारो कामगार या व्यवसायात गुण्यागोविंदाने काम करत आहेत. त्यामुळे रोजगार देणाऱ्या हा व्यवसाय बंद झाल्यास मोठी अराजकता माजेल. मागील अधिवेशनात लक्षवेधीवर यावर प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉक कधीही बंद पडणार नाही याची हमी दिली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर व स्थानिक राजकारणावर अशी काही सूत्रे हल्ली की तेथील गोदामांना मुंबई पोस्ट ट्रस्टने आता टाळी मारली. आजही तेथील जागा ही मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहे. मात्र तेथे त्या जागेचा कोणताही वापर करीत नाही. मग अशावेळी ससूनडाक ताब्यात घेऊन ते कोणासाठी मोकळे केले जात आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. तेथे थीम पार्क उभारण्याची एका बड्या उद्योगपतींची योजना असल्याचे कळत आहे. असे झाले तर मुंबईतील एक ऐतिहासिक ठेवा नामशेष होईल. मच्छीमार संघटनांनी लक्ष वेधले की सध्या अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात कर आकारणी सुरुवात केली आहे. त्याचा मोठा फटका कोळंबीला बसला आहे. त्यातच मच्छीमारीमध्ये आता अनेक संकटे उद्भवत असून व्यापार ही आता कमी होत चालला आहे. त्यामुळे मुंबईचा मूळ मालक असलेला कोळी समाज आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी आता मुंबईकरांनीच या लढ्यात उतरून ससून डाक कशा पद्धतीने वाचवता येईल यासाठी लढा उभारण्याची गरज आहे.
- अल्पेश म्हात्रे






