विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष भोवले
गणेश पाटील पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देणे, वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेला चांगलेच भोवले आहे. एका विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे या शाळेच्या चौकशीसाठी केलेल्या तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या शाळेत असलेली शैक्षणिक गुणवत्ता दर्जाहीन असल्याचे तसेच शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थी हितास बाधा पोहोचविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या शाळेची हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमाची मान्यता सन २०२५- २६ अखेर रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश शासनाच्या शालेय व क्रीडा विभाग मंत्रालयाने शनिवारी काढला आहे.
वसईच्या सातिवली परिसरात मनरादेवी एज्युकेशन संस्था कांदिवली पूर्व, मुंबईद्वारा संचालित श्री हनुमंत विद्यामंदिर (हिंदी व इंग्रजी माध्यम) शाळा आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना शाळेत यायला उशीर झाल्याने या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती.
त्यानंतर तब्येत खालावल्याने इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या काजल (अंसिका) गौड या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या शाळेची इमारत अनधिकृत असल्याचे आणि शाळेमध्ये इयत्ता नववी आणि दहावीचे अनधिकृत वर्ग भरत असल्याचे देखील समोर आले होते. विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईतील वालिव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी (शिक्षण) राजेंद्र उबाळे यांना निलंबित केले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि समितीने केली आहे.
या समितीने दिलेल्या अहवालानंतर शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे ४ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीनंतर संबंधित शाळेची मान्यता काढून घेण्याबाबतची शिफारस शिक्षण संचालकांकडून शासनाला करण्यात आली होती. त्यानुसार शासनाच्या शालेय व क्रीडा विभाग मंत्रालयाचे कार्यसन अधिकारी प्रमोद कदम यांनी या शाळेच्या हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांची मान्यता सन २०२५- २६ अखेर रद्द करण्यात येत असल्याचा आदेश १३ डिसेंबर रोजी काढला आहे.
अखेर शासन निर्णय धडकला
दुसऱ्या शाळेत होणार विद्यार्थ्यांचे समायोजन :
या शाळेत अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत गेल्या महिन्यातच करण्यात आले आहे. शाळेची मान्यता सन २०२५ - २६ अखेर रद्द करण्यात आल्याने आता पुढील शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांची समायोजन मे २०२६ मध्ये जवळच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे.
‘आरटीई’चे नियम न पाळल्याचा शाळा व्यवस्थापनावर ठपका
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (आर. टी. ई.) मधील तरतुदीनुसार विहित केलेली मानके व प्रमाणके यांची पूर्तता श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेने केलेली नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचविण्याचे कृत्य केल्याचा ठपका देखील या शाळा व्यवस्थापनावर ठेवण्यात आला आहे. शाळेची जागा व इमारत याबाबत अधिकृत परवानगी कागदपत्र सादर न केल्याने शाळेची इमारत अनधिकृत असल्याचे आणि इयत्ता ९ वी आणि १० वीचे वर्ग या शाळेने अनधिकृतरीत्या घेतल्याचे सुद्धा शासनाच्या निदर्शनास आले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक शिक्षा देण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्याची गंभीर दखल घेत शासनाने या शाळेची मान्यता रद्द केली आहे. आता या शाळेमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्यावर भर राहणार आहे. - मनोज रानडे, (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर.






