Sunday, December 14, 2025

मेसी मानिया

मेसी मानिया

कोलकात्यातील विवेकानंद युवा क्रांती मैदानात अर्जेंटिनाचा फुटबॉल स्टार लियोनेल मेसी याचे आगमन झाल्यावर त्याला पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. त्यामुळे शानदार समारंभाचे रूपांतर अभूतपूर्व गोंधळात आणि निषेध निदर्शनांत झाले. प्रचंड रक्कम भरून हजारो प्रेक्षकांनी मेसीच्या एका दर्शनासाठी या मैदानात गर्दी केली होती पण त्यांच्या पदरी अखेर निराशाच आली आणि चाहत्यांचा संताप झाला. नंतर जे झाले ते कधीही न कल्पना केलेले होते. बकेट, सीट्स, व्हीआयपी सोफ्यांची मोडतोड आणि जेथे हा कार्यक्रम होता तेथे नासधूस आणि काही ठिकाणी तर आग लावण्यात आली. अखेर आयोजकांना मेसीची भेट थोड्या वेळातच आटोपती घ्यावी लागली. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी चौकशी जाहीर केली आणि कार्यक्रमाची गैरव्यवस्था आणि गोंधळ का झाला याचा तपास सुरू आहे. पण या प्रकारात भारताची अब्रू गेली आणि जो देश विकासाच्या वाटेवर आहे त्याची लक्तरे कोलकात्यात निघाली. लोकांनी एका तिकिटासाठी तब्बल दहा हजार आणि १२ हजार इतके प्रचंड पैसे मोजले होते. पण त्यांना मेसीचे दर्शनही नीट होऊ शकले नाही. ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी चौकशी जाहीर करताना मेसीची मनापासून माफी मागितली आणि या दुर्दैवी प्रकाराबद्दल आयोजकांना दोषी ठरवले. पण मुळात आपल्याकडे अशा कार्यक्रमांसाठी चाेख व्यवस्था नाही? मेसीसारखे लोकप्रिय खेळाडू आपल्याकडे येत असताना आपल्याकडे अशा वेळेस प्रचंड गर्दी कशी हाताळायची त्याचे तंत्रच नाही? मुळात हे साल्ट लेक स्टेडियम इतक्या सेलेब्रिटीचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुरेसे होते का हा प्रश्न आहे. त्या ऐवजी इडन गार्डन या स्टेडियमवर हा कार्यक्रम ठेवला असता, तर अशी गर्दी आणि ममता सरकारची बेअब्रूही झाली नसती. आता मेसीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकाला पोलिसांनी विमानतळावर अटक केली आहे. त्याच्याविरोधात आता कडक कारवाई केली जाणार असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. आता या गोंधळाचा अपरिहार्य परिणाम म्हणजे भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध जुंपले आहे. या गैरव्यवस्थेबद्दल दोघांनीही एकमेकांवर जबाबदार असल्याचे आरोप केलेत. पण सर्वात जास्त जबाबदारी ही तृणमूल काँग्रेसची होती. कारण तो पक्ष सत्ताधारी आहे. पश्चिम बंगालमध्ये २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने ममतांसाठी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणे हे महत्त्वाचे होते. पण कोलकाता प्रशासन त्याबाबतीत अपयशी ठरले.

कोलकाता, गोवा या शहरात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय आहे. त्यामुळे या शहरांना वेगळाच दर्जा आहे. हे लक्षात घेऊन तरी निदान कोलकात्यात तरी फुटबॉल इव्हेंट असला तर तो व्यवस्थित पार पडावा अशी तेथील राज्य सरकारांनी दक्षता घ्यायला हवी. पण राज्य सरकारने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागते. या सर्व प्रकारात एकच गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे गर्दी व्यवस्थापन आणि तिचे तंत्र याबाबतीत आपण अजून खूप मागे आहोत. गर्दीचे व्यवस्थापन आणि राजकारण यांची सरमिसळ यात आपण कुशल नाही हे या घटनेवरून सिद्ध झाले. जी घटना कोलकात्यासाठी ऐतिहासिक प्रसंग होऊ शकली असती ती या गैरव्यवस्थेमुळे आणि चाहत्यांच्या गोंधळामुळे बाजूला पडली आणि राजकीय युद्ध सुरू झालेे. आता यातून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटना घडतात तेव्हा त्यांची जबाबदारी निश्चित केली जाणे आवश्यक आहे. कायदा आणि सुव्यवस्था कोसळण्यास जे प्रसंग घडले ते भविष्यात पुन्हा घडू नयेत अशी उपाययोजना आपण करायला हवी. आता राज्यपालांनीही सी. व्ही.आनंदा बोस यांनी आयोजकांवर प्रखर टीका केली आणि ते म्हणाले की अत्यंत निष्ठूरपणे आयोजकांनी लियोनेल मेसीची गोट इंडिया टूर आयोजित केली आणि फुटबॉल प्रेमींच्या भावनांकडे दुर्लक्ष केले. आयोजकांनी या प्रकरणी केवळ आपल्या तुंबड्या भरून घेण्याकडे लक्ष दिले आणि त्यात प्रेक्षकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या भावनांचा खेळ केल्याचा आरोप केला जात आहे.

आपल्याकडे परदेशी खेळाडू आणि अभिनेत्यांचे आकर्षण आहे आणि याचेच प्रत्यंतर आले. त्यामुळे अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांनी मेसीला पाहण्यासाठी गर्दी केली होती. हजारो लोक मेसीला पाहण्यासाठी आले होते पण त्याची झलकही पाहू शकले नाही. काही प्रेक्षकांनी हा गैरव्यवहार असल्याचा आरोप केला. सुरक्षा व्यवस्थेचे या सर्व प्रकारात तीनतेरा वाजलेच. लियोनेल मेसीच्या आगमनाने फुटबॉल प्रेमी आनंदित झाले होते पण त्यांना निराशाच पदरी आली. आता बऱ्याच फुटबॉल प्रेमींनी विश्वासघात झाल्याचे जाणवते अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि ती योग्य आहे. कारण या गोंधळाला जबाबदार सर्वस्वी आयोजकांचे गैरव्यवस्थापन आणि सावळागोंधळ होता. मेसीच्या कार्यक्रमाला साल्ट लेक स्टेडिमवर ८० हजार लोक जमले होते. त्यांनी गैरव्यवस्थापनामुळे तोडफोड केली. कोलकाता म्हणजे सिटी ऑफ जॉय म्हटले जाते, पण ८० हजार प्रेक्षकांसाठी सिटी ऑफ डिसॅस्टर ठरले. फुटबॉल चाहत्यांसाठी ही सायंकाळ म्हणजे मोडतोडीचा कार्यक्रम ठरला. साल्ट लेक स्टेडियमवरील आसनव्यवस्था मोडीत काढण्यात आली. चाहत्यांचा अमूल्य वेळ आणि अफाट पैसा यात वाया गेला आणि त्याची आयोजकांना ना खंत ना खेद. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत असे वाटत असेल तर आयोजकांनी अतिदक्षता घेतली पाहिजे. बहिष्कार हा उपाय नाही पण लोकांनीही अशा कार्यक्रमांना जाण्यापूर्वी हजारवेळा विचार केला पाहिजे. मेसीचे दर्शन दुर्मीळ पण जेव्हा घडतो तो प्रसंग आयुष्यातला यादगार प्रसंग बनला पाहिजे. मेसी मानिया हे सांगतो, की कोलकात्यात मेसीचे दर्शन ज्यांना घडले नाही, त्यांना पैसे मोजूनही काहीच पदरी पडले नाही. कोलकात्यातील लोक निश्चितच असे कमनशिबी नाहीत.

Comments
Add Comment