वार्तापत्र : कोकण
‘हापूस आंबा’ कोकणचाच राहिला पाहिजे. त्यासाठी जे काही करावे लागेल त्याची मानसिक तयारी पाहिजे. केंद्रिय स्तरावर माजी केंद्रिय मंत्री खासदार नारायण राणे निश्चितपणे आवश्यक असणारे प्रयत्न करतील यात शंका नाही; परंतु कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी, तज्ज्ञांनी यावर बोलण्याची आवश्यकता आहे. हापूसच्या दबावगटाचे वातावरण निर्माण झाल्याशिवाय आंबा बागायतदारांमध्ये जागरूकता येणार नाही. आम्हाला काय करायचय, आमचं काय आहे त्यात, नुकसान झाल, तर आमचं कुठे होणार आहे. या वृत्तीतला आपला वावर बदलला पाहिजे.
कोकणच्या हापूसची खासीयत आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी स्वत:च केलेली आहे. कोकणच्या किनारपट्टी भागात अगदी कडक कातळाला खड्डे मारून त्यात माती टाकून अनेक कोकणातील जुन्या-जाणत्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी एकेक किलोमीटरने पायी प्रवास करत हंड्याने पाणी नेऊन आंब्याच्या बागा उठवलेल्या आहेत. त्यामुळे कोकणचा हापूस आंबा नावारूपाला आणण्यात कोकणातील सामान्य शेतकऱ्यांने केलेले प्रामाणिक कष्ट आहेत. देशातील प्रत्येक भागातील त्या-त्या भागात पिकणाऱ्या फळांची, फुलांची किंवा वेगळेपणाची चर्चा ही नेहमीच होत असते. कोकण म्हटलं की, कोकणातील देवगड आणि रत्नागिरीत पिकणारा हापूस आंबा याच नाव जगभरात आहे. हे आज-काल नव्हे तर पूर्वीपासून इग्लंडच्या राजघराण्यातही कोकणच्या या हापूस आंब्याला विशेष स्थान आहे. जगभरात एक वेगळेपण जपत आजही कोकणचा हापूस स्वत:च स्थान टिकवून आहे. गेल्याकाही वर्षात सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू झाली. या जागतिक स्पर्धेतही आपल्या कोकणच्या हापूस आंब्याला अनेक स्पर्धक समोर आले. आंब्यातील अनेक प्रजाती काही वर्षात पुढे आल्या आहेत. हापूस आंब्याशी साम्य दर्शविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंब्यातील वेगवेगळ्या प्रकारात कर्नाटकमधील आंबा, गुजरातमधील बलसाड आंबा तसेच अन्य आंबेही स्पर्धेत उतरले; परंतु हापूस आंबा हा आपल्या कोकणचा मान, शान आणि तो आपल्या कोकणचा ब्रॅण्ड आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या सर्वच जिल्ह्यातून होणारा आंबा हा कोकणातील आंबा असला तरीही रत्नागिरी आणि देवगड हापूस आंबा हा वैशिष्ट्यपूर्ण स्वादिष्ट हापूस आंबा म्हणून ओळखला जातो. या कोकणच्या हापूस आंब्याची काही वैशिष्ट्यता राहिलेली आहे.
कोकणच्या या हापूसची बरोबरी अन्य कोणालाही करता येणार नाही; परंतु आपल्या देशातील काही राज्यातून कोकणच्या हापूस आंब्याशी स्पर्धा केली जात आहे. कर्नाटक राज्यातून येणारा आंबा कोकणचा आंबा म्हणून मार्केटमध्ये विकण्याचा प्रयत्न होतच आहे; परंतु दुर्दैवाने कोकणातील आंबा बागायतदार आजही निद्रिस्त आहे. आंबाtesh बागायतदार जागा नाही कोकणातील आंबा, काजू, कोकम, सुपारीच पिक घेणारा बागायतदार शेतकरी महाराष्ट्रातील उर्वरित भागातील शेतकऱ्याप्रमाणे तो जागृत नाही. तो अल्प संतुष्ट आहे. समाधानीवृत्ती जी कोकणमध्ये आहे त्याचपद्धतीने कोकणातील शेतकरी आहे. तो फार जागा नाही. संघटीत तर नाहीच. राजकीय विचारधारा कोणतीही असली तरीही कोकणचा बागायतदार म्हणून एकत्रित येऊन आंबा, काजू बागायतदारांनी संघटीतपणे एकत्र येत एक दबाव तंत्र निर्माण करण्याची आवश्यकता होती आणि आजही आहे; परंतु कोकणात एखाद्या विकास विषयक विचारांनी एकत्र येण्याची नेहमीच अडचण आहे. या एकत्रित येण्याचा नेतृत्व कोणीही करावं. आंबा, काजू बागायतींशी संबंधित असणाऱ्या सर्वांनी संघटीत झाले पाहिजे. सातत्याने बागायतीतील विविध प्रश्नांवर समस्यांवर चर्चा झाली पाहिजे. तरच यातून काही चांगल घडविता येईल. कोणतीही चर्चा न करता संघटीत न होता विखुरलेपणाचे अनेक तोटे आहेत. याचा विचार करण्याची खऱ्याअर्थाने होण्याची आवश्यकता आहे. गुजरात हापूस म्हणून ब्रॅण्ड बाजारात आणण्याचा आणि मान्यता करण्याचा प्रयत्न होत आहे. प्रत्येक राज्य, विभाग स्वत:च ब्रॅण्डिंग करण्याचा प्रयत्न तर करणारच; परंतु तरीही कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी आपल्यावर होणारे अतिक्रमण रोखले पाहिजे. यासाठी बागायतदार शेतकरी सर्वच राजकीय पक्षांनी सर्व मतभेद बाजूला सारत एकत्र येऊन कोकणच्या हापूस आंब्यांच्याबाबतीत संघर्ष करावा लागला तरीही तो केला पाहिजे. ‘हापूस आंबा’ हा कोकणचाच असला पाहिजे. राहिला पाहिजे. त्यासाठी जे काही कराव लागेल त्याची मानसिक तयारी असली पाहिजे. केंद्रिय स्तरावर माजी केंद्रिय मंत्री खा. नारायण राणे निश्चितपणे आवश्यक असणारे प्रयत्न करतील यात शंका नाही; परंतु कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी तसेच कोकणातील आंबा बागायतदार व आंबा व्यवसायातील तज्ज्ञ असणाऱ्यांनी अभ्यासकांनी यावर बोलण्याची आवश्यकता आहे. हापूसच्या दबावगटाचे वातावरण निर्माण झाल्याशिवाय कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये जागृकताही येणार नाही. कोकणामध्ये प्रत्येक बाबतीत कोणतीही गोष्ट घडली की तटस्तता असते. आम्हाला काय करायचय, आमच काय आहे त्यात नुकसान झाल तर आमचं कुठे होणार आहे. या वृत्तीतला आपला वावर बदलला पाहिजे. कोकणचा हापूस हा आपलाच ब्रॅण्ड आहे. आणि तो आपल्याकडून कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याविरोधात गप्प बसणे योग्य ठरणारे नाही. कोकणचा हापूस याची निर्मिती, त्याच संशोधन हे कोकणच्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांनी अपार कष्टाने निर्माण केला आहे. कोकणात आंबा तर सर्वत्रच होतो. परंतु कोकणातील किनारपट्टी भागातील आंब्याला एक वेगळा स्वाद आणि वास आहे. कोकणातील हापूस आंबा तयार (पिकला) झाला की त्याच दरवळणारा वास आंबा खाणाऱ्याला अस्वस्थ करीत असतो. कोकणच्या हापूस आंब्याच्या बागायती विशेषत: कोकणच्या किनारपट्टी भागात अधिक दिसतील. कोकणचा हा हापूस निर्माण आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी स्वत:च केली व कोकणच्या किनारपट्टी भागातही अगदी काळ्या कातळाला खड्डे मारून त्यात माती टाकून अनेक कोकणातील जुन्या-जाणत्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी एकेक किलोमीटरने पायी प्रवास करत हंड्याने पाणी नेऊन आंब्याच्या बागा उठवलेल्या आहेत. त्यामुळे हापूस कोकणचा हापूस आंबा नावारूपाला आणण्यात कोकणातील सामान्य शेतकऱ्यांने केलेले प्रामाणिक कष्ट आहेत. कोकणचा हापूस आंबा अनेक वर्षे नवी मुंबईच्या फळभाजी मार्केटमधील दलालांच्या हातात होता. आजही दलाल कोकणच्या हापूस आंब्याचा दर रूमाला खालून ठरवतात. आंबा बागायतदार शेतकऱ्याला आंबा दलाल ठरवेल तो दर आणि दलाल आंबा बागायतदार शेतकऱ्याला पाठवेल ती पट्टी अशीच काहीशी स्थिती कालही होती. तीच स्थिती आजही आहे. कोकण हापूसच्या ब्रॅण्डिंगसाठीही कोणी वेगळे प्रयत्न केले नाहीत. तर कोकण हापूसच्या रंग-रूप आणि स्वादिष्टतेनेच आपले स्थान निर्माण केले आहे. कोकणच्या हापूस आंब्याचे नेहमीच अढळस्थान राहिले आहे. त्याला स्पर्धा करण्याचा प्रयत्न नेहमीच होत राहणार आहे. कोकणच्या हापूस आंब्याशी स्पर्धा गेल्याकाही वर्षात केली जात आहे. त्या प्रयत्नांना यश त्यांना येत नसले तरीही अनेकांनी आपले प्रयत्न थांबवलेले नाहीत. कृषी क्षेत्रातही नवनवीन संशोधान करून जे प्रयत्न केले जात आहेत त्यातूनही अनेक राज्यांचे प्रयत्न हे स्वत:च्या भागातील आंबा अधिक मोठ्या प्रमाणात मार्केट कशारितीने काबीज करेल असाच राहणार आहे. आज ज्या पद्धतीने गुजरातच्या बलसाड आंब्याच्या माध्यमातून सुरू झाले आहेत. तोच प्रयत्न कधीतरी कर्नाटकच्या आंब्याच्याबाबतीत होणारा आहे. कर्नाटक राज्यात गेल्या दहा वर्षात आंबा बागायतीचे मोठ्याप्रमाणात क्षेत्र वाढले आहे. आता कोकणातील आंबा असेल किंवा काजू, कोकम आदी सर्वच बागायतदार शेतकऱ्यांनी फारच सावध असण्याची आवश्यकता आहे. जर आपण कोकणवासीय सावध नसलो तर मात्र बेसावध असल्याचा गैरफायदा उठवण्याचे प्रयत्न होतील. त्यासाठीच ही सावधानता बाळगणे अतिशय आवश्यक आहे. कोकणचा हा हापूस सर्वात श्रेष्ठच आहे. परंतु हे श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. सर्वच कोकणवासीयांनी आपल्या कोकणच्या हापूसचा ब्रॅण्ड कायम टिकवून ठेवलाच पाहिजे.
- संतोष वायंगणकर






