फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला उत्तरप्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून अटक केली आहे. मंगळवारी त्याला वसईत आणले जाणार आहे.
विरारमध्ये राहणाऱ्या समय चौहान या चाळ बिल्डरची २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १३ आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन गँगस्टर सुभाष सिंग ठाकूर हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी होता. तो जेजे हत्याकांड प्रकरणात उत्तरप्रदेशात फतेहगढ कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र २०१९ पासून उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात होता. त्यामुळे त्याला या प्रकरणात अटक करता येत नव्हती. अखेर २०२४ मध्ये सुभाषसिंग ठाकूर याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. सोमवारी गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि कारागृहातून सुभाषसिंग ठाकूर याला ताब्यात घेण्यात आले. सुभाषसिंग ठाकूर याला मंगळवारी मुंबईत आणले जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांनी दिली.
सुभाष सिंह ठाकूर दाऊद टोळीशी संबंधित गुंड आहे.दाऊदचा मेव्हणा इस्माइल इब्राहिम पारकर याची हत्या झाली. यानंतर दाऊदच्या सूचनांचे पालन करत सुभाष सिंह ठाकूरने इस्माइल इब्राहिम पारकरच्या हत्येशी संबंधित आरोपींना एक एक करुन ठार केले होते. यानंतर सुभाष सिंह ठाकूरचे महत्त्व एकदम वाढले. पण मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर सुभाष आणि दाऊद यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला, असे सांगतात. मुंबई जवळच्या शहरांमध्ये सक्रीय असलेल्या बिल्डरांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे हे उद्योग करुन ९० च्या दशकात सुभाष सिंह ठाकूरने स्वतःची दहशत निर्माण केली होती. दाऊदच्या संपर्कात आल्यामुळे तर त्याचे महत्त्व आणखी वाढले होते. पुढे अटक झाल्यानंतर तुरुंगात राहून सुभाष त्याचे साम्राज्य लिलया सांभाळत होता. पण मिरा भाईंदर वसई-विरार पोलिसांनी अटक केल्यामुळे सुभाष विरोधात कठोर कायदेशीर कारवाईची शक्यता वाढली आहे.






