धरमशाला : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. धरमशाला येथे झालेला सामना भारताने सात विकेट राखून जिंकला. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कटकचा टी ट्वेंटी सामना १०१ धावांनी जिंकला तर दक्षिण आफ्रिकेने चंदिगड येथील टी ट्वेंटी सामना ५१ धावांनी जिंकला. आता लखनऊ आणि अहमदाबाद येथे प्रत्येकी एक टी ट्वेंटी सामना होणार आहे. मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन पैकी किमान एक सामना जिंकणे आवश्यक आहे. भारतीय संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यास उत्सुक असताना भारतासाठी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल आजारी पडला आहे. डॉक्टरांनी अक्षरला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. अक्षरवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. यामुळे अक्षर पटेल लखनऊ आणि अहमदाबाद येथील टी ट्वेंटी सामन्यांमध्ये खेळणार नाही.
जसप्रीत बुमराह कौटुंबिक कारणामुळे धरमशाला येथील सामना खेळला नव्हता. घरातील जवळची व्यक्ती रुग्णालयात असल्यामुळे बुमराह विशेष परवानगी घेऊन धरमशालाचा सामना खेळण्याऐवजी नातलगाला भेटण्यास गेला होता. पण लखनऊ आणि अहमदाबादच्या टी ट्वेंटी सामन्यांसाठी बुमराह उपलब्ध आहे. यामुळे अक्षर नसला तरी बुमराह आहे असा विचार करुन टीम इंडियाला पुढील सामन्यांसाठी नियोजन करावे लागणार आहे.






