Monday, December 15, 2025

गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; पती अनंत गर्जेला पुन्हा एसआयटीकडून अटक

गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; पती अनंत गर्जेला पुन्हा एसआयटीकडून अटक

मुंबई : भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात पती अनंत गर्जे याला विशेष तपास पथकाने पुन्हा अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी गौरी गर्जे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. उच्चशिक्षित महिला आणि राजकीय वर्तुळाशी संबंधित व्यक्तीची पत्नी असल्याने या घटनेची राज्यभर चर्चा झाली होती. प्रकरण उघडकीस आल्यानंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती.

गौरी गर्जे मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता एसआयटीकडून थेट कारवाई करत अनंत गर्जे याला दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे.

   

अनंत गर्जे याला आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डीसीपी रागसुधा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नव्या अटकेमुळे तपासाला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गौरी गर्जे मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर काही तासांतच वरळी पोलिसांनी अनंत गर्जे याला अटक केली होती. त्यानंतर तो आधी पोलीस कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. वरळी पोलिसांनी दाखल केलेल्या प्रकरणात त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. अशातच एसआयटीकडून झालेली दुसरी अटक या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी ठरली आहे. आता एसआयटीच्या तपासातून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment