धुळे : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात महापालिकांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय पक्षांनी महापालिकांची सत्ता डोळ्यांपुढे ठेवून हालचाली सुरू केल्या आहेत. या वातावरणात भाजपने शरद पवार गटाला धक्का दिला आहे.
धुळे जिल्ह्यात भाजपने शरद पवार गटाला धक्का दिला आहे. धुळे शहराच्या माजी महापौर कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या कल्पना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कल्पना महाले यांच्यासोबत माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. महाले यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. हा राजकीयदृष्ट्या धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाला धक्का असल्याची चर्चा आहे.
निवडणुकीला जेमतेम महिना उरला असताना महाले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे आणि शरद पवार गट कमकुवत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान जिथे शक्य आहे तिथे भाजप युती म्हणून निवडणूक लढणार आहे आणि निवडक ठिकाणी स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. जिथे स्वतंत्रपणे लढू तिथे मैत्रीपूर्ण लढती लढू असेही फडणवीस म्हणाले. पुणे मनपात भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ आहे. या स्थितीत तिसऱ्या पक्षाचा फायदा होऊ नये म्हणून एकमेकांविरोधात मैत्रीपूर्ण लढती लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.






