पाच लाखांहून अधिक नागरिकांची सिकलसेल तपासणी
पालघर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्ह्यात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती वाढविणे, आजाराचे लवकर निदान करून रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिकलसेल जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सन २०२१ पासून आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ९३४ नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये १२ हजार ४२१ सिकलसेल वाहक तसेच ९७५ सिकलसेलग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांची माहिती सिकलसेल पोर्टलवर ऑनलाईन नोंदविण्यात आली असून त्यांना शासनामार्फत मोफत औषधोपचार, आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा व समुपदेशन सेवा दिल्या जात आहेत. तसेच पात्र रुग्णांना संजय गांधी निराधार योजना अंतर्गत आर्थिक मदतही दिली जात आहे.
सिकलसेल हा अनुवांशिक आणि रक्तपेशींशी संबंधित आजार असून तो आई-वडिलांकडून अपत्यांमध्ये संक्रमित होतो. या आजारामध्ये लाल रक्तपेशी विळ्याच्या आकाराच्या व ताठर बनतात. या विकृत रक्तपेशी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, परिणामी संबंधित अवयवांतील रक्तपुरवठा खंडित होऊन रुग्णांना तीव्र आणि असह्य वेदना सहन कराव्या लागतात. याचा डोळे, प्लीहा, यकृत, त्वचा तसेच इतर अवयवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सिकलसेल आजारावर संपूर्ण उपचार उपलब्ध नसला तरी योग्य वेळी तपासणी, नियमित उपचार, समतोल आहार आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन केल्यास आजारावर प्रभावी नियंत्रण ठेवता येते.
वाहक–वाहक, वाहक–रुग्ण किंवा रुग्ण–रुग्ण यांच्यात विवाह झाल्यास होणारे अपत्य सिकलसेल वाहक किंवा रुग्ण होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे विवाहपूर्व सिकलसेल तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिकलसेल आजाराची लक्षणे म्हणून रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, हात-पाय सुजणे, भूक मंदावणे, सांधेदुखी, लवकर थकवा येणे, चेहरा निस्तेज दिसणे, लहान बालकांमध्ये वारंवार जंतुसंसर्ग होणे तसेच शरीर पिवळसर होणे ही लक्षणे दिसून येतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी व या जनजागृती सप्ताहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी केले आहे.






