Monday, December 15, 2025

अधिवेशन संपताच भाजपचा उबाठाला दणका; तेजस्वी घोसाळकरांनी सोडली साथ

अधिवेशन संपताच भाजपचा उबाठाला दणका; तेजस्वी घोसाळकरांनी सोडली साथ

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच भाजपने उबाठाला दणका दिला आहे. मुंबईतील उबाठाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी सोमवारी भाजपचा झेंडा हाती घेतला. दादर येथील भाजप कार्यालयात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रवेशानंतर भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रभागातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. "मी २०१७ मध्ये शिवसेनेतून नगरसेविका म्हणून निवडून आले होते. आता भाजपमध्ये प्रवेश करताना खूप दुःख होत आहे, कारण ज्यांनी मला ओळख दिली त्यांची साथ सोडणे कठीण आहे. पण विकासाची कामे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला," असे त्या म्हणाल्या. तसेच, फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या प्रकरणाचा सीबीआय तपास जलदगतीने व्हावा आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

तेजस्वी घोसाळकर या उबाठाच्या माजी नगरसेविका आहेत. २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ (दहिसर) मधून त्या विजयी झाल्या होत्या. त्या माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्या नियंत्रणातील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तेजस्वी यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >