मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी होऊन निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारी अर्ज करता येतील. अर्जांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. उमेदवारांना २ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. यानंतर ३ जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
कार्यकाळ संपलेल्या महापालिकांमध्ये आधी कोविड संकट, नंतर आरक्षणाचा पेच यामुळे प्रदीर्घ काळ निवडणुका झाल्या नव्हत्या. आता निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार महिन्याभरात निवडणुका होणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन महापालिकांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू केली आहे. आता महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी होऊन निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होणार आहे. जेमतेम महिन्याभरात नागरिकांना मनपांसाठी लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी मिळणार आहे. यामुळे मोठे राजकीय पक्ष कोणत्या महापालिकेत युती किंवा आघाडी करणार का की एकमेकांविरोधात लढणार याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर ...
राजकीय युती - आघाडीबाबत तर्कवितर्क सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना निवडणूक कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेचे स्वागत केले आणि भाजप निवडणुकीसाठी तयार असल्याचे जाहीर केले. राज्यात महायुतीचे सरकार आहे. पण महापालिकांच्या पातळीवर लढताना भाजप अनेक ठिकाणी शिवसेनेसोबत, काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत तर निवडक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत निवडणुका लढण्याची तयारी करत आहे. पुणे मनपात तसेच राज्यात निवडक ठिकाणी भाजप मैत्रीपूर्ण लढतीच्या तयारीत आहे. महायुतीच्या विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी निवक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. युती, महायुती की मैत्रीपूर्ण लढती याची अधिकृत घोषणा लवकरच करू पण पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रबळ असल्यामुळे तिथे मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता जास्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या सांगितले.






