Monday, December 15, 2025

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने अवघ्या दहा दिवसांत कमाईचे सगळे जुने आकडे मागे टाकले असून रविवारी झालेली कमाई तर ऐतिहासिक ठरली आहे.

‘धुरंधर’ने केवळ कमाईचे रेकॉर्ड मोडले नाहीत, तर हिंदी सिनेमातील पारंपरिक हिरो-व्हिलनचं समीकरणही बदलून टाकलं आहे. चित्रपटाचा नायक रणवीर सिंग असला, तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे ते खलनायकाची भूमिका साकारणारा अक्षय खन्ना. त्याचा थरारक आणि प्रभावी अभिनय हा सिनेमाचा सर्वात मोठा यूएसपी ठरत आहे. ‘धुरंधर’साठी दुसरा रविवार विशेष ठरला. रिलीजच्या दहाव्या दिवशी चित्रपटाने भारतात तब्बल ५८.२० कोटी रुपयांची नेट कमाई केली. हिंदी सिनेसृष्टीतील आतापर्यंतची ही सर्वाधिक रविवारची कमाई मानली जात आहे.

चित्रपटाच्या कमाईचा आलेख पहिल्या दिवसापासून सातत्याने वरच चढत गेला. पहिल्या आठवड्यात सोमवारपासूनच रोजच्या कमाईत वाढ होत गेली. मंगळवार, बुधवार आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यातही हीच गती कायम राहिली. दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ‘धुरंधर’ने पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक कमाई नोंदवली.

या यशामागे केवळ भव्य अ‍ॅक्शन किंवा दिग्दर्शन नाही, तर अक्षय खन्नाचा धडाकेबाज खलनायकाचा रोल हे मोठं कारण ठरत आहे. सोशल मीडियावर हिरोपेक्षा खलनायकाचीच अधिक चर्चा रंगताना दिसत आहे. अनेक प्रेक्षक अक्षय खन्नाचा अभिनय पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जात आहेत. याच कारणामुळे ‘धुरंधर’ने ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’सारख्या मोठ्या चित्रपटांनाही कमाईत मागे टाकल्याचं स्पष्ट झालं आहे.

दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘धुरंधर’ अव्वल स्थानी पोहोचला आहे. ‘छावा’ने दुसऱ्या आठवड्यात १४०.७२ कोटींची कमाई केली होती, तर ‘पुष्पा २’ने हिंदीत १२८ कोटींचा टप्पा गाठला होता. हे दोन्ही रेकॉर्ड आता ‘धुरंधर’ने मोडीत काढले आहेत.

Comments
Add Comment