Monday, December 15, 2025

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना 'दे धक्का'; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, अमित साटम यांच्या उपस्थितीत सोहळा

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना 'दे धक्का'; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, अमित साटम यांच्या उपस्थितीत सोहळा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईत जबर धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या घोसाळकर कुटुंबातील सदस्य आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. दादर येथील 'वसंत स्मृती' कार्यालयात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला

फेब्रुवारी २०२४ मध्ये पती आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान निर्घृण हत्या झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या कठीण काळातून सावरत असतानाच तेजस्वी घोसाळकर यांनी आता राजकीय कारकीर्दीची नवी दिशा निश्चित केली आहे. त्या २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्या भाजपचे प्राबल्य असलेल्या मुंबई बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होत्या, तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती.

 

भावूक पत्रातून मांडली भूमिका:

भाजप प्रवेशापूर्वी तेजस्वी यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणतात, "अभिषेकच्या हत्येनंतर माझे आयुष्य बदलले. दोन लहान मुले आणि जनतेची जबाबदारी पेलताना मला अनेकदा कोसळून पडल्यासारखे झाले. सध्याच्या काळात काम करण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी मला एका खंबीर ताकदीची गरज आहे. केवळ पदासाठी नव्हे, तर मुलांच्या भविष्यासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी मी हा निर्णय घेत आहे." या निर्णयाने उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >