मुंबई: आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. दरम्यान उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण, ठाकरे गटाच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून आज त्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राजीनामाही दिला होता. त्यानंतर मातोश्रीवर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली होती. अखेर तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकला आहे. उबाठानंतर त्यांनी आता सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहे तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवकर अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान, आज सकाळी १० वाजता वसंत स्मृती येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठासाठी हा मोठा धक्का आहे.





