Sunday, December 14, 2025

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर '

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

नागपूर : मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण आहेत..? त्यांना गाडून आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच खरी धुरंधर ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी अधिवेशन काळात झालेल्या टीकेला आपल्या भाषणातून जशास तसे प्रत्युत्तर दिले.

यावेळी बोलताना, आम्ही विकासकामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू ठेवला असून विरोधकांना मात्र बिनबुडाचे आरोप करण्यावाचून काहीही काम शिल्लक राहिलेले नाही असे सांगितले. काही जण अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ.. असे वागत आहेत..फक्त पर्यटनासाठी नागपुरात येतात, आज आरायवल आणि उद्या डीपारचर अशी त्यांची अवस्था आहे.. ते आले पण अधिवेशात एकही प्रश्न विचारला नाही, एकाही विषयावर सभागृहात बोलले नाहीत, त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी ते किती जागरूक आहेत तेच यातून दिसून आले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकांचे प्रश्न सोडून फक्त विरोधी पक्षनेतेपद द्या यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र विरोधी पक्षनेता होण्यासाठी निदान तेवढे उमेदवार निवडून यावे लागतात तुम्हाला जनतेनेच विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवले असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी करत त्यांनी माध्यमांमध्ये आदळ आपट केली, मात्र स्वतः मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना आपल्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ठेवले होते याचा त्यांना सोयीस्कररित्या विसर पडला असे सांगितले. माझ्याविषयी असलेल्या मळमळ आणि जळजळ यातूनच हे आरोप होत असल्याचे आवर्जून नमूद केले.

मुंबईकरांसाठी आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतले, मुंबईतील ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना दिलासा दिला, मुंबईला पागडीमुक्त करण्याचा निर्णय घेतला, त्यातून १३ हजार इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला. नॅशनल पार्क मधील २५ हजार कर्मचाऱ्यांना ५किमी परिसरात पर्यायी घरे देण्याची योजना आणली, मुंबईतील गिरण्यांच्या जागेवरील चाळींच्या पुनर्विकासासाठी नियमावलीमध्ये बदल केले, सिडकोचा घरांच्या किंमती कमी करून १० टक्क्यांनी या किंमती कमी केल्या, ५० एकरापेक्षा मोठ्या भूखंडावर क्लस्टर पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात १७ प्रकल्पांची निवड केली आहे. सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळावा असे अनेक निर्णय घेतले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ४० लक्ष झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत असे सांगितले. या निर्णयाद्वारे २३ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या योजना सुरू करून आम्ही त्यांच्या चरणी ही योजनापुष्पे वाहिली आहेत असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मात्र एवढी वर्षे मुंबईत ज्यांची सत्ता होती त्यांनी नक्की काय केले..? मुंबई तोडणार तोडणार एवढेच तुणतुणे कायम वाजवले. मिठी असो वा कोविड कुठेही डाका टाकायचे सोडले नाही. तिजोरीला वेटोळे घालून प्रत्येक कामात घोटाळे करण्याचे काम केले. त्यामुळे मुंबईच्या तिजोरीवर डाका घालून स्वतःची तिजोरी भरणारा खरा रेहमान डकैत कोण आहे..? ते लोकांसमोर यायला हवे. अशा रेहमान डकैतना पाणी पाजणारी 'धुरंधर' महायुतीच असेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा