राज्य सरकारसमोर नवा पेच; राज्यात सध्या २ हजार बिबट्यांचा वावर
नागपूर : गुजरातमधील ‘वनतारा’ या प्राणी संरक्षण केंद्राने महाराष्ट्रातील ५० पेक्षा अधिक बिबट्यांना सामावून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सध्या २ हजार बिबट्यांचा वावर असल्याने, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला आता नव्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
राज्यात कोल्हापूर, नाशिक, पुणे, नागपूर यांसह अनेक जिल्ह्यांत बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. ग्रामीण व शहरी भागांत बिबटे दिसू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
नसबंदी करून बिबट्यांचे हल्ले थांबणार नाहीत : बिबट्यांना मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात शेळ्या-मेंढ्या सोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, अजित पवार यांनी हा हास्यास्पद निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिली. बिबट्यांआधी ग्रामीण भागातील लोकच या शेळ्या-मेंढ्यांची शिकार करतील, असे ते म्हणाले. नसबंदी केली, तरी बिबट्यांची नवी पैदास थांबेल. पण, सध्या मानवावर हल्ला करणाऱ्या बिबट्यांचा बंदोबस्त नसबंदी करून होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.






