Saturday, December 13, 2025

सुगंध कर्तृत्वाचा

सुगंध कर्तृत्वाचा

स्नेहधारा : पूनम राणे

इयत्ता आठवीचा वर्ग. वर्गात स्काऊट गाईडचा तास चालू होता. अनघा बाई परिसर स्वच्छता आणि पर्यावरण याविषयी माहिती देत होत्या. शाळा शहरात असूनही आजूबाजूला निसर्गरम्य परिसर होता. आजूबाजूला दाट जंगलही होते. शाळेला मोठे पटांगण होते. त्यामुळे बाईंनी उपक्रमही त्याच प्रकारचा निवडला होता. वर्गातील प्रत्येकी सहा-सहा विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले होते. प्रत्येक गटाला सदाफुली, सोनचाफा, मोगरा, गुलाब, निशिगंधा अशी वेगवेगळ्या फुलझाडांची नावे दिली होती. प्रत्येक गटातील विद्यार्थी अत्यंत आवडीने आपले काम जबाबदारीने सांभाळत होते.

शाळेच्या पटांगणात प्रत्येक गटाला जागा नेमून दिली होती. जागेमध्ये फुलझाडांची लागवड करायची. नावाप्रमाणे प्रत्येकाला त्या प्रकारची फुलझाडे आणून देण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थी अत्यंत जबाबदारीने आपले फुलझाड लावून त्याची काळजी घेत होते. आळीपाळीने प्रत्येक जण त्या झाडाला पाणी घालत होते. आजूबाजूला वाढलेले गवत काढून टाकत होते. असा नित्यक्रम जवळजवळ सात-आठ महिने चालला होता.

एके दिवशी सदाफुली आणि गुलाब यावर अत्यंत सुंदर कळ्या आल्या होत्या. दोन दिवसांतच गुलाबी रंगाची मनमोहक आकर्षक फुले झाडांवर फुलली होती. विविध रंगांची फुलपाखरे त्या फुलांवर येऊन बसत होती. फूल कोणते आणि फुलपाखरू कोणते हे ओळखताही येणार नव्हते. खरंतर ज्या विद्यार्थ्यांचा गुलाब आणि सदाफुली हा गट होता त्यांना अत्यंत आनंद झाला होता. ते जणू आनंदाने नाचतच होते. आपण लावलेल्या झाडाला फूल आले याचा त्यांना अत्यंत आनंद झाला होता.

ज्या मुलांच्या झाडाला फुले आली होती, असे विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना आणून ते फूल दाखवत होते. दहा-पंधरा दिवसांतच इतर झाडानाही फुले येऊ लागली. मात्र मोगरा काही फुलला नाही. मोगरा या गटातील विद्यार्थ्यांना फार वाईट वाटले. त्यांनी बाईंना कल्पना दिली. बाई म्हणाल्या, थोडं थांबा. त्यांनाही फुले येतील. थोड्या दिवसांतच मोगऱ्याच्या हिरव्यागार झाडाला कळ्या येताना दिसू लागल्या. मोगरा गटाला अत्यंत आनंद झाला आणि एक दिवस हिरव्यागार पानातून पांढरा शुभ्र मोगरा वाऱ्यावर डोलू लागला. वाऱ्याच्या मंद झुळकेने मोगऱ्याचा सुगंध साऱ्या पटांगणात दरवळत होता. खरंतर प्रत्येकाने स्वकष्टाने लावलेल्या झाडावर फुले आली होती. मात्र काही दिवसांतच उमलून आलेली फुलं दोन-तीन दिवसांनी खाली गळून पडली. प्रत्येक गटातील विद्यार्थ्यांना फारच वाईट वाटले. मात्र बाईंनी विद्यार्थ्यांची समजूत काढली आणि म्हणाल्या, ‘‘मुलांनो प्रत्येकाचा उमलण्याचा आणि फुलून येण्याचा एक काळ ठरलेला असतो. जसा फुलांचा तसाच आपलाही.”

पण त्या उमलण्याच्या काळात आपल्या कर्तृत्वाने इतरांना सुगंधित करणे हे फार महत्त्वाचे असते. आपण किती दिवस जगलो यापेक्षा कसे जगलो हे अत्यंत महत्त्वाचे असते. आपण या राष्ट्राचे नागरिक म्हणून ही गोष्ट सतत लक्षात ठेवायला हवी. सगळे विद्यार्थी बाईंचे बोलणे कान देऊन ऐकत होते. आपल्या हातून एका चांगल्या कामाची सुरुवात झाली याचे मुलांना अत्यंत समाधान वाटत होते. शाळेत येताना आणि शाळा सुटल्यानंतर प्रत्येक जण आपल्या झाडांना पाणी घालून, नजर टाकून नंतरच शाळेतून बाहेर निघत होते.

अशा प्रकारे विद्यार्थ्यांना फुलझाडांचा लळा लागला होता. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली होती. आपला उपक्रम यशस्वी झाला हे पाहून अनघा बाईंना फार आनंद झाला होता.

तात्पर्य :- पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या उपक्रमातून मिळेल त्या ठिकाणी वृक्ष संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Comments
Add Comment