Saturday, December 13, 2025

बाळाचा हट्ट!

बाळाचा हट्ट!

कथा : रमेश तांबे

एक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं, उड्या मारायचं, खूप धमाल करायचं. बाळाच्या आईला बाळाचं केवढं कौतुक वाटायचं.

पण एके दिवशी बाळाला काय झालं कुणास ठाऊक! बाळ बसलं रुसून. आता मांजरीचं बाळ बोलेना, चालेना, दुधाला तोंड लावेना. खाऊसुद्धा खाईना! मांजरीने आपल्या बाळाला प्रेमाने जवळ घेतलं आणि विचारलं, “काय रे बाळा काय झालं तुला? तू असा रुसून का बसलास माझ्यावर? तू खात नाहीस, की काही पीत नाहीस! असं नको करू बाळा. अरे तू आजारी पडशील; मला फार काळजी वाटते बघ तुझी!” मग बाळ “लाडानंच म्हणालं, “आई गं मला ना...

पिझ्झा हवा, बर्गर हवा चायनीज भेळ, वडापाव हवा रोज रोज आईस्क्रीम खाणार दोन मुठी कुरकुरे खाणार!”

बाळाची ही विचित्र मागणी ऐकून मांजर आश्चर्यचकित झाले. ती बाळाला म्हणाली, “अरे बाळा हे काय बोलतोयस तू. मला तर काहीच कळत नाही बघ.” मग बाळ म्हणालं, “आई गं, हे तर पदार्थ आहेत खाण्याचे. आमच्या वर्गातली कितीतरी मुलं आणतात. शाळेत मधल्या सुट्टीत एकट्यानेच गुपचूप खातात. आता जोपर्यंत हे पदार्थ मला तू देत नाहीस तोपर्यंत मी शाळेतही जाणार नाही आणि तुझ्याशी बोलणार देखील नाही!” आई म्हणाली, “अरे बाळा हे पदार्थ खाणे चांगले नाही. ते कुठे बनवलेत, कसे बनवले, त्यात काय काय मिसळले आहे कुणास ठाऊक! मी तर कधीच खाल्ले नाहीत बघ! आणि त्यासाठी खूप पैसेदेखील लागतात. हे असले पदार्थ खाल्ल्यावर आजारपणदेखील येऊ शकते.” आता बाळ हट्टालाच पेटलं, मला पिझ्झा, बर्गरच हवा! मग मात्र मांजरीचा नाईलाज झाला. तिने बाळासाठी मसालेदार पिझ्झा मागवला. बाळाने तो मिटक्या मारत खाल्ला.

पुढच्या दिवशी मांजरीच्या बाळाने चायनीज भेळ मागवली. कधी कुरकुरे, तर कधी वडापाव! मांजरीला चिंता वाटू लागली. पण बाळाच्या हट्टापुढे तिला काहीच करता येईना. थोड्या दिवसातच बाळाचं पोट फुगलं. वजन इतकं वाढलं की बाळाला चालता येईना. त्यानंतर एक दिवस असा उजाडला की बाळाच्या पोटात दुखू लागलं. इतकं की ते रडू लागलं. गडबडा लोळू लागलं. शेवटी मांजरीने बाळाला डॉक्टरकडे नेलं. एक दिवस दवाखान्यात ठेवलं. तेव्हा कुठे बाळाला बरं वाटलं. पूर्ण दिवसभरात डॉक्टरने बाळाला दोन वेळा सुई टोचली, तीन-चार वेळा कडू औषध प्यायला दिलं. सात-आठ कडू कडू गोळ्या खायला दिल्या. औषधाने तर बाळाच्या तोंडाची चवच गेली. शिवाय तिथलं चव नसलेलं जेवण! हे सारं पाहून बाळ मनातून हादरलं. पिझ्झा, बर्गर खाऊन असं होत असेल तर ते न खाल्लेलं बरं; असं बाळानं मनोमन ठरवलं.

घरी सोडताना डॉक्टर म्हणाले, “बाळा जर असेच बाहेरचे पदार्थ खाल्ले तर पुन्हा आजारी पडशील आणि पुढच्या वेळी पोट कापावे लागेल तुझे!” ते ऐकून बाळ खूप घाबरलं. मग मांजर आपल्या बाळाला घेऊन घरी आली. पाहते तर काय बाळाचे वर्गमित्र, बालमित्र हजर! बाळाला भेटायला. प्रत्येकाने बाळासाठी भेट आणली होती. कोणी पिझ्झा, कोणी वडापाव, तर कोणी चायनीजची भेळ! पण बाळाने नम्रपणे सांगितले, “हे असेल पदार्थ रोज खाणे चांगले नाही. तुम्ही सर्व परत घेऊन जा आणि तुम्हीसुद्धा खाऊ नका.” बाळाला आलेलं शहाणपण पाहून मांजरीचे डोळे पाणावले.

Comments
Add Comment