विशेष : प्रा. मुक्ता पुरंदरे
‘एक गाव एक पाणवठा,’ हमाल पंचायत, रिक्षा संघटना, देवदासी निर्मूलन, गोवा मुक्ती संग्राम, कष्टाची भाकरी, परित्यक्ता चळवळ अशा अनेक संघटनांशी जोडलेले बाबा आढाव यांचे निधन हा पुरोगामी चळवळीला हादरा आहे. त्यांच्या सततच्या संघर्षामुळे १९६९ मध्ये राज्यात महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला. त्यांच्या कार्यातून सामाजिक समतेचा ठोस पाया रचला गेला.
सोमवार ८ िडसेंबर २०२५ रोजी ज्येष्ठ सामािजक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचा जीवनसंघर्ष संपला. त्यांच्या ९६ वर्षांचा प्रवास सर्रकन डोळ्यांसमोरून गेला. ‘एक गाव एक पाणवठा,’ हमाल पंचायत, रिक्षा संघटना, देवदासी निर्मूलन, गोवा मुक्ती संग्राम, कष्टाची भाकरी, परित्यक्ता चळवळ अशा किती तरी संघटनात्मक कामांशी बाबांचे नाव जोडले गेले होते. बाबा सुरुवातीला समाजवादी पक्षाबरोबर काम करायचे; मात्र समाजकारण की राजकारण हे द्वंद्व त्यांच्याच नेत्यांनी त्यांच्यापुढे उभे केले, तेव्हा त्यांनी समाजकारणासाठी राजकारण सोडले. त्यांनी राजकीय पक्ष सोडला आणि १९५५ मध्ये ‘हमाल पंचायत’ स्थापन केली. याच पंचायतीची पुढे १९७२ मध्ये कामगार संघटना झाली. १९५६ मध्ये वाहतूक क्षेत्रातील कामगारांना योग्य वेतन मिळावे, या मागणीसाठी हमाल पंचायतीने पहिले आंदोलन केले. त्यानंतर त्यासाठी केलेल्या सततच्या संघर्षामुळे १९६९ मध्ये राज्यात महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला.
असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी भारतातील हा पहिला कायदा होता. याचे संपूर्ण श्रेय हे बाबा आढाव यांच्या संघर्षालाच जाते. पुढे हमालांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. १९७२ मध्ये दलितांना सर्व ठिकाणी पाणी मिळावे, यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ नावाने राज्यभर मोर्चे काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या आंदोलनानंतरची ही सर्वात मोठी सामाजिक चळवळ होती. पाचशे गावांचा दौरा करून बाबांनी ‘एक गाव एक पाणवठा’ ही योजना प्रत्यक्षात आणली. दलितांना पाणवठे मुक्त झाले. महाराष्ट्रातील जातीय व्यवस्थेवर थेट प्रहार करण्यासाठी बाबांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळ सुरू केली होती. त्या माध्यमातून दलितांना पाण्याचा समान अधिकार मिळवून दिला. सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या केल्या आणि त्या माध्यमातून सामाजिक समतेचा ठोस पाया रचला गेला.
ग्रामीण समाजातील जातीय भेदभावाला उघडपणे आव्हान देणारी बाबांची चळवळ महाराष्ट्रात अभूतपूर्व ठरली. सामाजिक क्रांतीचे अनेक उपक्रम बाबांनी हाती घेतले आणि यशस्वीपणे राबवले. देवदासी प्रथा निर्मूलन आता यशस्वी झाले असले, तरी त्याचा पायाही बाबांनी घातला होता, हे अनेकांना माहीत नाही. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आणि गोवा मुक्तीच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुण्यातील कामगारांना स्वस्त, पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी ‘कष्टाची भाकरी योजना’ हीदेखील बाबांचीच कल्पना होती. या योजनेतील पहिल्या शाखेची सुरुवात २ ऑक्टोबर १९७४ रोजी पुण्यातल्या भवानी पेठेत झाली.
बाबा आढाव क्रांतिकारक सत्यशोधक परंपरेचे मोठे पाईक होते. त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तनाचा मोठा लढा चालवला. ते एक कृतिशील विचारवंत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबतही सुरुवातीच्या आंदोलनांमध्ये बाबा सहभागी होते. पुढे वैचारिक मतभेद झाले आणि आढाव यांनी त्यांची साथ सोडली. कागद काच पत्रा कष्टकरी पंचायत, रिक्षा पंचायत अशा अनेक प्रश्नांवर बाबा आढाव ताकदीने लढत राहिले. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा सांगणारे डॉ. आढाव जोतिबा फुले यांना, त्यांच्या विचारांना पुरोगामी वर्तुळानेही अनेक वर्ष डावलले असते, असे मत परखडपणे मांडायचे. बाबा म्हणायचे, ‘तुमच्या पिढीला सांगतो, की आम्ही इतिहास नाही, वर्तमान आहोत.’ ‘सत्यमेव जयते’ म्हणत अखेरपर्यंत वंचितांना हक्क मिळवून देण्यासाठी लढत राहिले. ‘सीरम इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून लसनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ. सायरस पूनावाला यांना २०१४ चा पुण्यभूषण पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला होता. यावेळी पुरस्काराची रक्कम योग्य व्यक्तीला द्यावी, अशी विनंती डॉ. पूनावाला यांनी पवार यांना केली होती.
पूनावाला यांनी या एक लाख रुपयांमध्ये आणखी नऊ लाख रुपये घातले. हे सर्व पैसे पवार यांनी सामाजिक कामासाठी बाबांना दिले होते. ‘कष्टाची भाकर’च्या ४० व्या वर्धापनदिनी बाबा म्हणाले होते, की अन्याय आणि दडपशाहीच्या विरोधात पेटून उठणे म्हणजेच केवळ क्रांती नाही, तर एखादा नवीन उपक्रम हीदेखील एक प्रकारची विधायक क्रांतीच आहे. कोरोनाकाळात देशव्यापी टाळेबंदी लागू असताना ‘कष्टाची भाकर’ने अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अन्य सामान्यांना मोठा आधार दिला. आपल्या घरी जेवण्यापेक्षा अनेक पोलीस इथे जेवायला प्राधान्य देत होते. तसेच अनेकदा ससून हॉस्पिटलमधील अनेक आरोग्य कर्मचारीही ‘कष्टाची भाकर’मध्ये जेवायला येत असत. बाबांनी ‘कष्टाच्या भाकरी’चा विस्तार केला. अहिल्यानगरसारख्या अन्य ठिकाणीही ती सुरू झाली. आता बारा हजारांहून अधिक लोक दररोज कष्टाच्या भाकरीचा लाभ घेतात. हमाल, मापाड्यांच्या जेवणाचे होणारे हाल पाहून बाबांनी सुरू केलेली ही योजना नंतर सरकारनेही स्वीकारली. त्यातच बाबांचे द्रष्टेपण दिसते.बाबांनी पुणे शहरात सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांना आदराने ‘पुणे शहराचे कुटुंबप्रमुख’ असेही म्हटले जात असे. त्यांनी पुणे येथे ‘हमाल पंचायत’ आणि ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ यांसारख्या संस्था स्थापन केल्या.
बाबा आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले. त्यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन दर्शवणारे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये ‘एक गाव, एक पाणवठा,’ ‘मीच तो माणूस’ हे आत्मचरित्रात्मक लेखन आणि ‘एक साधा माणूस’, ‘जगरहाटी’, ‘रक्ताचं नातं’, ‘असंघटित कामगार : काल, आज आणि उद्या’, ‘जातपंचायत : दाहक वास्तव’,‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतन’ ही काही महत्त्वाची पुस्तके आहेत. या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. बाबांच्या समाजकार्यात या पुस्तकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता बाबा आढाव आपल्यात नाहीत. त्यांचे हे साहित्य आगामी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
एक सत्यशोधक विचारवंत म्हणून त्यांची जवळपास सत्तर वर्षांची कारकीर्द लक्षवेधी होती. महिला, समता, कष्टकरी, जातीचा मुद्दा आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी आयुष्यभर लढा दिला. महाराष्ट्राच्या वाटचालीत त्यांच्या कामाचे योगदान मोठे होते. त्यांच्यावर राष्ट्र सेवा दल, साने गुरुजींच्या विचारांचाही प्रभाव होता. महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून केलेला मूलभूत क्रांतीचा प्रयत्न ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाद्वारे एक प्रकारे डावलला गेला, अशी खंत त्यांना होती. महात्मा फुले यांचे विचार आजच्या काळातदेखील पुढे नेण्यासाठी बाबा आढाव आयुष्यभर कार्यरत राहिले. समाजात मूलभूत स्वरूपाचे बदल करण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी विज्ञानाची कास धरली; मात्र त्याचबरोबर गेल्या शंभर वर्षांत विज्ञानाने केलेल्या प्रचंड प्रगतीला परिवर्तनाच्या चळवळीशी जोडताना सुधारणावाद्यांकडून विज्ञानाकडे दुर्लक्ष झाले, असे मत त्यांनी व्यक्त केले.
एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विषमता निर्मूलन समितीचे प्रमुख कार्य त्यांनी केले. सत्यशोधक चळवळीचे नेते म्हणून दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक, अपंग आणि कष्टकरी यांच्या हक्कांसाठी अथक संघर्ष केला. आणीबाणी काळात प्रचंड मेळावे घेऊन सोळा महिन्यांचा कारावास भोगला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय सदस्य म्हणून नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर अंधश्रद्धाविरोधी मोहिमेद्वारे लढा दिला.
आढाव यांनी कार्यकर्त्यांसाठी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ उभारला आणि विविध परिवर्तनवादी संस्थांना एकत्र आणले. ‘सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार’ ही महात्मा फुले यांची सुचिता त्यांनी जपली. सत्तेत गेल्यानंतरही ते समताधिष्ठित लोकशाहीसाठी झटले. त्यांचा अखंड संघर्ष आणि शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवण्याचा ध्यास अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे. डॉ. आढाव यांना २०२० मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर होणार होता; मात्र हा सरकारी अलंकार एक प्रकारची बेडी आहे आणि त्या मार्गाने जाऊ नये, असे मन मला सांगत आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांसोबतच नाते कायम अबाधित ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल’, असे सांगत त्यांनी हा सन्मान नाकारला होता.






